टाईम नियतकालिकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या इंटरनेटवरील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग दुसऱ्यांदा समावेश करण्यात आला आहे. ट्विटर आणि फेसबुक यांसारख्या समाज माध्यमांवर असलेली मोदींची लोकप्रिय पाहता ‘टाईम’ने त्यांचा उल्लेख ‘इंटरनेट स्टार’ असा केला आहे. सध्या ट्विटरवर मोदींचे १८ लाख फॉलोअर्स आहेत तर, त्यांच्या फेसबुक पेजलाही ३२ लाख लाईक्स आहेत. त्यामुळेच ‘टाईम’कडून मोदींचा इंटरनेटवरील ३० प्रभावी लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प, किम कर्दाशिअन, लेखिका जे.के. रोलिंग, फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचाही समावेश आहे. टेक्नोसॅव्ही अशी ओळख असलेल्या मोदींनी ट्विटरवरून लाहोर भेटीची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या यादीसाठी व्यक्तींची निवड करताना संबंधित व्यक्तीचा जागतिक समाज माध्यमांवरील प्रभावाचा विचार करण्यात आल्याचे ‘टाईम’तर्फे सांगण्यात आले.