जागतिक बँकेच्या अहवालातील व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने केलेल्या प्रगतीचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते शनिवारी दिल्लीतील प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही केलेल्या विस्मयकारक कामाची जागतिक बँकेने योग्य ती दखल घेतली. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. मात्र, काही जणांना व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने १४२ व्या स्थानावरून १०० व्या स्थानापर्यंत प्रगती केली, याचाशी काहीच देणेघेणे नाही. त्यांना स्वत:लाही काही करायचे नाही आणि जे करत आहेत त्यांना प्रश्न विचारायचे काम ते करत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्यांनी यापूर्वी जागतिक बँकेसाठी काम केलेले आहे, अशांचाही समावेश आहे. मी असा पंतप्रधान आहे की, ज्याने अजूनही जागतिक बँकेची इमारतही बघितलेली नाही. मात्र, यापूर्वी जागतिक बँकेत काम केलेल्या काही लोकांनी पंतप्रधानपद भुषविले होते. तरीही हेच लोक जागतिक बँकेने भारताच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊनही प्रश्न उपस्थित करत असल्याचे सांगत मोदी यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.
माझ्याकडे दुसरे काम तरी काय आहे? माझा देश, येथील सव्वाशे कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशंकात भारताने जी झेप घेतली आहे, ती कामगिरी यापूर्वीच करता येणे शक्य होते. भारताची आजची परिस्थिती अजून चांगली झाली असती. यापूर्वी दिवाळखोरी आणि बुडीत कर्जासंबंधी नियमांमध्ये योग्य सुधारणा झाली असती तर हे भाग्य तुमच्याच वाट्याला आले नसते का?, असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. त्यामुळे आता जागतिक बँकेच्या अहवालावरून आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा आपण सगळ्यांनी देशाच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे मोदींनी सांगितले.
जागतिक बँकेतर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या व्यवसाय करण्यासाठी सुलभता निर्देशांकाच्या १९० देशांच्या यादीत भारताने यंदा शंभरावे स्थान पटकावले आहे. गतवर्षीच्या भारताच्या मानांकनात यंदा ३० अंकांनी सुधारणा झाली आहे. तसेच आपल्या मानांकनात सुधारणा साधणाऱ्या सर्वोत्तम १० देशांमध्येही यंदा भारताने स्थान पटकावले आहे. हा निर्देशांक व मानांकन ठरवताना भारतातील मुंबई व दिल्ली या दोन शहरातील परिस्थिती प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीत मुंबईचे स्थान पुन्हा अधोरेखित झाले आहे. या मानांकनातून हे स्पष्ट होते की, भारत व्यवसाय करण्यासाठी अधिक सज्ज आणि खुला आहे. तो आता जगातील अन्य देशांशी व्यवसाय करण्यासाठीचा चांगला देश म्हणून स्पर्धा करीत आहे, असे जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाच्या उपाध्यक्ष अॅनेट डिक्सन यांनी सांगितले होते.
दिल्लीत पगार जास्त, तर मुंबईत सुट्ट्या – जागतिक बँक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 12:15 pm