मध्य प्रदेशमधल्या एका मशिदीमध्ये दाउदी बोहरा समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या समाजाचं देशप्रेम हे सगळ्या भारतासाठी एक आदर्श उदाहरण ठरावं असं असल्याचे सांगितले. “बोहरा समुदाय हा शांतीचा संदेश देत जगतो. हा शांतीचा संदेश भारताचं जगातल्या अन्य देशांपेक्षा असलेलं वेगळेपण अधोरेखीत करतो,” मोदी म्हणाले.

अशारा मुबारक या इमाम हुसेन यांच्या पुण्यतिथीला झालेल्या कार्यक्रमात इंदूरमध्ये पंतप्रधान सहभागी झाले होते. इस्लामी वर्षाच्या सुरुवातीला अशारा मुबारक पाळण्यात येतो. प्रेषित मोहम्मदांचे नातू इमाम हुसेन यांच्या आठवणी या काळात जागवण्यात येतात.

गुजरातमधल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत बोहरा समुदायाशी माझे अत्यंत चांगले संबंध जुळले होते अशी आठवण मोदींनी सांगितली. मला प्रत्येकवेळी बोहरा समुदायानं सहकार्य केलं असं मोदी म्हणाले. बोहरांचे धार्मिक प्रमुख सय्यदना मुफद्दल सैफुद्दिन यांची पंतप्रधानांनी भेट घेतली. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते.

या वर्षाअखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका असून भाजपासाठी या दृष्टीनं पंतप्रधानानांची भेट अत्यंत महत्त्वाची आहे. इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बोहरा समाजाचे लोक राहत असून उज्जैन व बुऱ्हाणपूरचाही विचार केला तर मध्यप्रदेशमध्ये एकूण अडीच लाख बोहरा मुस्लीम राहतात.