अमृतमहोत्सवी सोहळ्यात पंतप्रधानांचे गौरवोद्गार; सर्वपक्षीय स्नेहीजनांकडून कौतुक
एकेकाळी मुंबई गुन्हेगारांच्या ताब्यात होती, मात्र शरद पवार यांनी प्रयत्नपूर्वक मुंबईला त्यापासून वाचवले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे गुरुवारी कौतुक केले. शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांसह उद्योगजगातील धुरीण मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पवार यांचे कार्य सलाम करण्याजोगे असल्याचे सांगून भाषणाच्या शेवटी ‘सलाम बॉम्बे-सलाम शरद पवारजी!’ या चार शब्दांमध्ये भावना व्यक्त केली.

पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही या वेळी उपस्थित होत्या. व्यासपीठावर पंतप्रधान व राष्ट्रपतींसमवेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. याखेरीज नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव, राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
पवार यांचे कौतुक करताना त्यांच्या ‘दूरदृष्टी’चा प्रत्यय पंतप्रधान मोदी यांनी दिला. पवार उत्कृष्ट शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांना बदलत्या राजकीय हवामानाचा अंदाज सर्वात लवकर येतो, अशा शब्दांत पवार यांचे राजकीय कौशल्य मोदींनी मांडले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवार यांच्याशी आलेल्या संपर्काच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. पवार यांनी स्वत:च्या प्रतिमेची कधीही पर्वा केली नाही. त्यांनी मलादेखील असेच करण्यास सांगितले होते. प्रतिमेत न अडकता जे योग्य वाटते ते करा, असा सल्ला पवार यांनी दिल्याचे मोदी म्हणाले.
शरद पवार यांनी कृषी खात्याची धुरा सांभाळताना केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख सर्वच वक्त्यांनी केला. राष्ट्रपती म्हणाले की, कृषी खाते पवार यांनी स्वत: मागून घेतले होते. दहा वर्षांनंतर त्यांनीच तो निर्णय योग्य ठरवला. कधी काळी अन्नधान्याची टंचाई असणारा भारत स्वयंपूर्ण झाला. त्यांच्या काळात भारत सर्वाधिक गहू व तांदूळ पिकवणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये असताना पवार यांच्यासमवेतच्या वीस वर्षांच्या आठवणींना सोनिया गांधी यांनी उजळा दिला. पवार यांच्या बेरजेच्या राजकारणाची नवी व्याख्याच सोनिया गांधी यांनी केली. पवार यांचे ‘नेटवर्किंग’ कौशल्य वादातीत आहे. त्या दृष्टीनेही ते देशातील सवरेत्कृष्ट राजकारणी आहेत, असे सोनिया यांनी म्हणताच पवार यांनाही हसू आवरले
नाही.

काँग्रेसला कानपिचक्या
४९ वर्षांच्या संसदीय राजकारणात कधीही सभागृहात मर्यादा ओलांडली नाही. कारण यशवंतराव चव्हाण यांच्याकडून सभ्यतेचा आदर्श मिळाला. लोकांची भावना सदन चालावे हीच असते. कमतरता असल्यास ती समोर आणा. परंतु सदन चालले तरच समस्या समोर येतील, अशा शब्दांत शरद पवार यांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. आपला देश विविधतेत एकता ठेवून आहे. आर्थिक व सामाजिक विकासावरच गरिबी दूर होऊ शकते. त्यासाठी धर्म, क्षेत्र व भाषेपलीकडे जाऊन लोकांमध्ये सद्भाव निर्माण केला पाहिजे, असे सांगून पवार यांनी असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरही टिप्पणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त नवी दिल्लीत गुरुवारी आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.