अमेरिकेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी गुजरातमधील अहमदाबादजवळील मोटेरा क्रिकेट स्डेटियमचे उद्घाटन केलं. यावेळेस त्यांनी भारत- अमेरिका संबंधांवर भाष्य करणारे भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावेळी उपस्थितांना संबोधित करत ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मात्र आपले भाषण संपवून ट्रम्प यांच्याकडे कार्यक्रमाची सूत्रे सुपूर्द करताना मोदींनी ट्रम्प यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. यावरुन आता नेटकऱ्यांनी पंतप्रधानांना ट्रोल केलं आहे. मोदींनी केलेल्या चुकीच्या उल्लेखाचा व्हिडिओ अनेकांनी ट्विट केला आहे.

सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांचे स्वागत केले. नंतर ट्रम्प यांनी पत्नी, कन्या इव्हान्का, जावई जॅरेड कुश्नर यांच्यासह साबरमती आश्रमास भेट दिली. नंतर ते मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ मेळाव्यात सहभागी झाले. तेथे सुमारे सव्वा लाख नागरिकांसमोर बोलताना दोन्ही नेत्यांनी एकमेकांची स्तुती केली.

मोदी काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा ऐतिहासिक आणि भारत-अमेरिका संबंधांचा नवा अध्याय लिहिणारा आहे, असं सांगत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्याआधी त्यांनी उपस्थितांना भारत माता की जय आणि भारत अमेरिका फ्रेण्डशीप लिव्ह लॉग अशा घोषणा देण्यास सांगितले. “भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध केवळ भागीदारीपुरते मर्यादित राहिलेले नाहीतर तर त्यापलीकडे जाऊन दोन्ही देशांमध्ये धनिष्ट नाते निर्मा झाले आहे. नवा इतिहास रचला जात असून नवी आव्हाने, संधी, बदल आदींचा पाया घातला जात आहे,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं.

ट्रम्प यांचा उल्लेख चुकला

आपले भाषण संपवताना मोदींनी ट्रम्प यांच्याकडे भाषणासाठी माईक देताना त्यांचा उल्लेख भारताचा मित्र असा केला. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेताना मोदी चुकले. “आता मी मंचावर स्वागत करतो भारताचे मित्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मीस्टर डोलांड ट्रम्प यांचे,” असं वाक्य मोदी म्हणाले. या वाक्यात मोदींनी ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख डोनाल्डऐवजी डोलांड असा केला.

युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी मोदींचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. “प्रधानमंत्रीजी, डोलांड ट्रम्प कोण आहे?,” अशी कॅप्शन श्रीनिवास यांनी या व्हिडिओ दिली आहे.

श्रीनिवासच नाही तर अनेक नेटकऱ्यांनी मोदींच्या भाषणातील १० सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला असून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.