पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या परदेश दौऱ्यात ६५ भेटवस्तू मिळाल्या असून त्या ३.११ लाख रुपये किमतीच्या आहेत. गेल्या दहा महिन्यांत त्यांनी जे दौरे केले त्यात या वस्तू मिळाल्या असल्याचे माहिती अधिकारातील प्रश्नांच्या उत्तरात स्पष्ट झाले आहे.
१९ फेब्रुवारीला मोदी यांना यजमान देशाकडून सोने व हिऱ्यांची वस्तू मिळाली ती ७५ हजार रुपये किमतीच आहे. दोनदा त्यांना टी सेट व एकदा पुस्तके भेट म्हणून मिळाली. एकदा गौतम बुद्धांचा पुतळा भेट म्हणून मिळाला असून मोदी यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यात गौतम बुद्धांच्या शिकवणुकीवर भर दिला होता. पोर्सेलिन डिशेस, मंदिरांच्या प्रतिकृती, चित्राकृती, कार्पेट, छायाचित्रे, दागिने त्यांना मिळाले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना २०१० ते २०१३ दरम्यान ८३.७२ लाखांच्या भेटवस्तू मिळाल्या होत्या.
२०१० मध्ये त्यांना २०.९१ लाखांची तलवार मिळाली, त्याशिवाय ४८.९३ लाखांचे अलंकार मिळाले, त्याशिवाय घडय़ाळ, पेन, प्रार्थनेसाठी मॅट, पशुपतीनाथ पुतळा, सोन्याची पेटी मिळाली होती. २०१० ते २०१३ दरम्यान यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना ३.८४ लाखांच्या भेटवस्तू मिळाल्या त्यात दोन लाखांची ब्रेसलेट, पशमिना शाल, रग, पर्स, टीसेट, फोटोफ्रेम यांचा समावेश आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ४.८३ लाखांच्या भेटवस्तू मिळाल्या असून त्यात साडय़ा, दागिने, पेन, रेशमी स्कार्फ, चायना डिशेस, फोटो फ्रेम, नागदेवीचा पुतळा, बुद्धांचा पुतळा, ड्रॅगनचा पुतळा, टॅबलेट कॉम्प्युटर, कँडल स्टँड यांचा समावेश आहे. विरोधी पक्षनेत्या असताना त्यांना २०१० ते २०१३ दरम्यान २ लाखांच्या भेटवस्तू मिळाल्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना जून २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान दोन भेट वस्तू मिळाल्या. त्यांची किंमत तीन हजार रुपये आहे. डिसेंबरमध्ये त्यांना दोन टेबल क्लॉक (घडय़ाळे) मिळाले. याच काळात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना १३,८०० रुपये किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या. सरकारी अधिकाऱ्यांना ५ हजारांच्या वस्तू मिळाल्या त्या परराष्ट्र मंत्रालयाकडे जमा करण्यात आल्या आहेत.