सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे राफेल करारातील घोटाळ्याबाबत चौकशी करत होते, त्यामुळेच त्यांना हटवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला असलेल्या झालावाड येथे आयोजित एका सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा सीबीआय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यामागे हात असल्याचा थेट आरोप केला.

‘काल रात्री देशाच्या चौकीदाराने सीबीआयच्या संचालकांना पदावरुन हटवलं कारण ते राफेल घोटाळ्याबाबत चौकशी करत होते’ असं म्हणत राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केला. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक व दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. याबाबत राहुल यांनी ट्विटरद्वारेही मोदींवर निशाणा साधला. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे राफेल घोटाळ्याबाबतचे कागदपत्र गोळा करत होते. मात्र, त्यांना बळजबरी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. जो कोणी राफेल घोटाळ्याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न करेल त्याला हटवलं जाईल, संपवलं जाईल असा थेट संदेश मोदींनी दिला आहे. देश आणि देशाची राज्यघटना संकटात आहे. असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.


 


यावेळी बोलताना राहुल यांनी आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी वसुंधरा राजे यांच्या मुलाला कोट्यवधी रुपये दिल्याचाही आरोप केला. तसंच फरार उद्योगपती विजय मल्ल्या हा देखील पलायन करण्याच्या आधी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटला होता याचा पुनरुच्चार केला. याशिवाय मेहुल चोक्सी आणि निरव मोदी यांच्यावरुनही राहुल यांनी भाजपावर निशाणा साधला. राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधी हे राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला असलेल्या झालावाड येथे आयोजित एका सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर सीबीआयमधील वाद, राफेल करार आणि अन्य मुद्द्यांवरुन टीका केली.