उत्तर प्रदेशातील उन्नावमधील एका ११ वर्षांच्या मुलाने लिहिलेल्या पत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याच्या सूचनाही केल्या.
उन्नावमध्ये राहणाऱ्या नयन सिन्हा या ११ वर्षांच्या मुलाला रोज शाळेत जाताना रेल्वे रूळ ओलांडावे लागते. त्याच्यासोबत अनेक मुले-मुली रोज जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून शाळेत जातात. यामध्ये अपघात होण्याची शक्यता लक्षात आल्याने नयनने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून आपली व्यथा मांडली. पंतप्रधानांकडूनही या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आणि उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घालून उपाय शोधण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर लगेचच उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नयनला पत्र लिहून त्याची समस्या आपल्यापर्यंत पोहोचली असून, पंतप्रधानांनाही उपायांबद्दल माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.