काश्मीर मुद्दावर ठामपणे भारताची साथ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार मानले. मोदींनी पुतिन यांना काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयामागची भूमिका समजावून सांगितली तसेच पाकिस्तानच्या दिशाभूल करणाऱ्या खोटया प्रचाराची माहिती दिली.

मोदी यांनी स्वत:हून काश्मीर मुद्दाची पुतिन यांना माहिती दिली असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले. काश्मीरच्या विषयावर स्पष्ट संदेश दिल्याबद्दल मोदींनी पुतिन यांचे आभार मानले. काश्मीर भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे.

कुठल्याही देशाच्या अंतर्गत मुद्दामध्ये तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला भारत आणि रशियाचा विरोध आहे असे पंतप्रधान मोदी पुतिन यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचे व्लादिवोस्तोक विमानतळावर आगमन झाल्यानंतर गळाभेट घेऊन स्वागत केले. यानंतर हे दोन्ही नेते एकाच बोटीद्वारे व्लादिवोस्तोकमधील शीप बिल्डिंग कॉम्प्लेक्सकडे रवाना झाले.

तसेच, पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा देखील केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी, ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी आपण मला दिलेले आमंत्रण ही सन्मानाची बाब आहे. दोन्ही देशांमधील सहकार्याच्या भावनेला नवा आयाम मिळवून देण्याचा हा ऐतिहासिक प्रसंग असल्याचे म्हणत, मी उद्याच्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले.