देशाचा ७२ वा स्वातंत्र्य दिवस असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या साधारण ९० मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध मुद्दे मांडले आणि आपल्या साडेचार वर्षांच्या कामांचा पाढाही वाचला. तसेच काश्मीर प्रश्नावरही भाष्य केले. स्वच्छ भारत अभियान, गरीबी, शेतकरी प्रश्नांवर प्रामुख्याने भाष्य केले. यापैकी गरीब या शब्दावर त्यांनी प्रचंड भर दिला. पंतप्रधानांच्या ९० मिनिटांच्या भाषणात त्यांनी ३९ वेळा गरीब शब्द वापरला.

किसान (शेतकरी) हा शब्द १४ वेळा वापरला तर गाव हा शब्द २२ वेळा वापला. कृषी हा शब्द ११ वेळा वापरला. मात्र रोजगार हा शब्द फक्त एकदा वापरला नोटाबंदीच्या मुद्द्यावर त्यांनी आजच्या भाषणात एकदाही भाष्य केले नाही. २०१५ मध्ये झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब हा शब्द ४४ वेळा वापरला होता. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आपल्या भाषणात नरेंद्र मोदी गरीब, ग्रामीण भारत आणि शेतकरी यांच्या प्रश्नांवर प्रामुख्याने दिसून आले आहे. २०१४ मध्ये झालेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा शब्द ६ वेळा वापरला, २०१५ मध्ये झालेल्या भाषणात हाच शब्द २३ वेळा वापरला, २०१६ मध्ये ३१ वेळा, २०१७ मध्ये १९ वेळा वापरला. अशाचप्रकारे २०१४ मध्ये गरीब हा शब्द २९ वेळा, २०१५ मध्ये ४४ वेळा, २०१६ मध्ये २७ वेळा, २०१७ मध्ये १७ वेळा म्हटला होता अशीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान आज आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील साडेचार वर्षात झालेला विकास, जगामध्ये भारताची प्रतिमा कशी बदलली यावर आपल्या खास शैलीत भाष्य केले.