प्रायोगिक विमान तयार करणारे मुंबईकर वैमानिक अमोल यादव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्यानंतर तातडीने चक्रे फिरून यादव यांना विमान उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून मंजुरी मिळाली आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी मुंबईच्या एका उपनगरातील त्यांच्या घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान तयार केले आहे. त्याला परिपूर्ण स्वरूप देण्यासाठी त्यांनी १८ वर्षे खर्च केली आहेत. नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून (डीजीसीए) नियमानुसार ‘उड्डाणाचा परवाना’ (परमिट टू फ्लाय) मिळण्याच्या प्रक्रियेला मंजुरीसाठी २०११ सालापासून यादव यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांवरून त्यांना तीन दिवसांपूर्वीच ही मंजुरी मिळाली. याच भेटीदरम्यान मोदींनी यादव यांना एक सल्ला दिल्याचा खुलासा तप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला आहे.

मोदींनी यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी आपल्या महत्वकांशी प्रकल्पाबद्दल चर्चा केली. यासंदर्भात पीएमओ ट्विटर अकाऊंटवरुन काही ट्विटस करण्यात आले आहेत. या ट्विटसमध्ये मोदी आणि यादव यांचे फोटो पोस्ट करण्यात आले असून यादव यांच्या कामाची माहिती देण्यात आली आहे. तसेच मोदींनी यादव यांची केवळ भेट घेऊन चर्चाच केली नाही तर त्यांनी यादव यांना अशीच मोठी स्वप्न पाहत राहा असे प्रोत्साहनही दिल्याचे पीएमओच्या ट्विटर अकाऊण्टवर नमूद करण्यात आले आहे.

पहिल्याच ट्विटमध्ये भारतीय कौशल्याचा गौरव असं नमूद करण्यात आले आहे. “पंतप्रधान मोदींनी काल (२० ऑक्टोबर) अमोल यादव यांची भेट घेतली. पेशाने वैमानिक असणाऱ्या यादव यांनी भारतामध्ये लहान आकाराची विमाने निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘यादव यांनी पूर्णपणे भारतीय बनावटीचे एक छोटे विमान तयार केले. मात्र या प्रकल्पाला काही कारणाने उशीर झाला. प्रायोगित तत्वावर बनवण्यात आलेल्या या विमानाला उड्डाणाची परवानगी मिळण्यातही अडचणी आल्या,’ असं दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यादव यांच्या प्रकल्पामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल मोदींना समल्यावर त्यांनी तातडीने यादव यांना हवे ते सहकार्य करुन हा प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याचे आदेश संबंधित खात्यांना दिल्याचे तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘यादव यांच्यासारखे संशोधक हे नवीन भारताची ओळख आहेत असा विचार असणाऱ्या पंतप्रधानांनी संबंधित यंत्रणांना यादव यांना तातडीने सर्व परवानग्या देण्याच्या सूचना केल्या,’ असं हे ट्विट आहे.

पीएमओच्या शेवटच्या ट्विटमध्ये मोदींनी यादव यांना एक सल्ला दिल्याचे सांगितले आहे. “पंतप्रधान मोदींनी कॅप्टन यादव यांचे केवळ अभिनंदन केले नाही तर अशाच पद्धतीने मोठी स्वप्न पाहत राहा असा सल्लाही यादव यांना दिला,” असं शेवटच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली शिफारस

अमोल यादव हे परवाना मिळण्यासाठी झगडत असल्याचे कळल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब पंतप्रधान मोदी यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मोदी यांच्या मध्यस्थीमुळे या तरुण वैमानिकाच्या विनंतीवर तातडीने प्रक्रिया झाली आणि त्यांना डीजीसीएकडून ‘उड्डाणाचा परवाना’ मिळाला. रविवारी पंतप्रधानांशी संवाद साधताना कॅप्टन यादव यांनी, आपले स्वप्न साकारण्यासाठी मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पालघरमध्ये कारखाना?

वांद्रे- कुर्ला संकुलात २०१८ साली झालेल्या पहिल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणुकदारांच्या परिषदेत १९ फेब्रुवारी रोजी यादव आणि राज्य सरकार यांच्या सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा हा करार झाला. या करारानुसार पालघर इथे १९ आसनी विमाननिर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी राज्य सरकार यादव यांना जमीन उपलब्ध करून देणार आहेत.