बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी चित्रपटातील एका गाण्याचा आधार घेतला. त्याला प्रत्युत्तर देताना मोदी यांनी जद(यू), राजद आणि काँग्रेस हे ‘थ्री इडियट्स’ असल्याचा हल्ला चढविला. बिहार निवडणुकीनंतर मुशायरा कला आत्मसात करून रिकाम्या वेळेत त्याचा सराव करावा, असा सल्लाही मोदी यांनी नितीशकुमार यांना दिला.

सीतामढी मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, राजदचे नेते लालूप्रसाद यादव हे चांगली करमणूक करतात हे आपण पाहिले आहे आणि त्यामुळे बिहारमधील जनतेचीही अनेक वर्षांनंतर करमणूक होत आहे. पंरतु सध्या लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्यात अनेक प्रश्नांवर तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. मात्र आता करमणूक या क्षेत्रातही स्पर्धा निर्माण झाली आहे, असे मोदी म्हणाले.
नितीश यांचा मुशायरा सोमवारी पाहावयास मिळाला, करमणुकीचे नवे स्वरूप सुरू करून आपण लालू यांचा पराभव करू शकतो, असे त्यांना वाटले. महाआघाडीत तीन राजकीय पक्ष आहेत. नितीशकुमार यांनी मुशायऱ्यांसाठी थ्री इडियट्स चित्रपटातील गाण्याची निवड केली, असे मोदी म्हणाले. बहती हवा सा था वो, गुजरात से आया था वो, काला धन लानेवाला था वो, कहा गया उसे ढूंढो, हमको देश की फिक्र सताती है, वो बस विदेश के दौरे लगाता है, हमको बढी महंगाई सताता, वो बस मन की बात सुनाता, हर वक्त अपनी सेल्फी खिचता था वो, कहा गया उसे ढूंढो, अशी टीका नितीश यांनी केली होती.