मध्य आशिया आणि भारतामधील समान इस्लामिक दुव्यांना साद घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मध्य आशियाई देशांना मंगळवारी केले.
मोदी प्रथमच मध्य आशियाई देशांच्या दौऱ्यावर असून त्यांनी उझ्बेकिस्तान व कझाकिस्तान या पारंपारिक मित्रांना दहशतवादाविरोधात लढण्यासाठी व मध्य आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोघांनीही एकत्र यावे, याशिवाय हा प्रांत विकसित व सुरक्षित होऊ शकत नसल्याचे सांगितले. ते नाझरबयेव विद्यापीठामध्ये एका संमेलनात संबोधित करत होते.
आपण अस्थिरतेच्या शेवटच्या टोकावर उभे आहोत. कट्टरतावाद व दहशतवाद आपली परीक्षा पाहत आहेत. त्यांना काही देशांनी व संघटनांनी पोसल्याचे आपण पाहत आहोत. आज सायबर गुन्हेगारीही वाढली असून याद्वारे दहशतवादी आपल्या कृत्यांना घडवतात. याला आळा घालण्यासाठी सुरक्षा वाढविण्याबरोबरच मानवतावादाची बांधीलकी जपण्यासाठी या प्रदेशातील देशांनी एकत्र आले पाहिजे. या भेटीमध्ये यासाठी नक्की प्रयत्न करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.
मध्य आशियासोबतच्या भारताच्या वारशांना साद घालताना इस्लामचे चांगले गुणधर्म म्हणजेच ज्ञान, धर्मनिष्ठा, दया, कल्याण यांचे साधम्र्य त्यांनी या वेळी विशद केले. हे या दोन्ही प्रांतादरम्यानचे ऐतिहासिक दुवे असून यामुळेच प्रेम आणि सौहार्दाचे नाते टिकून आहे. आणि यामुळेच कट्टरतावीदी शक्तींना नाकारण्यात आल्याचे ते म्हणाले.
‘ब्रिक्स’साठी मोदी आज रशियात
ब्रिक्स तसेच शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या येथे आगमन होईल. या परिषदेच्या निमित्ताने मोदी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटण्याची शक्यता आहे. सहा सदस्यीय शांघाय सहकार्य संघटनेचे भारताला पूर्ण सदस्यत्व मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, उझबेकिस्तान व ताजिकिस्तान हे सहा देश सदस्य आहेत. आतापर्यंत भारताला या गटाचा निरीक्षक दर्जा आहे.
याखेरीज पाच देशांच्या ब्रिक्स परिषदेत आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ब्रिक्स बँक स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक चलनामध्ये पत सुविधा सुरू करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहिली जाणार आहे. भारताचे के. व्ही. कामत यांच्याकडेच बँकेची धुरा आहे.
मोदी यांच्याशिवाय ब्रिक्स परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन, ब्राझीलचे अध्यक्ष रौसेफ व दक्षिण आफ्रिकेचे जेकब झुमा सहभागी होतील.