पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून या भेटीत ते तामिळींचे प्रभावक्षेत्र मानले जाणाऱ्या जाफना येथेही जाण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेचे मंत्रिमंडळ प्रवक्ते व मंत्री राजिता सेनरत्ने यांनी यासंबंधी माहिती दिली. मोदी हे १३ मार्च रोजी लंकेस तीन दिवसांच्या भेटीसाठी येत असल्याचे सेनरत्ने म्हणाले. तामिळींचे प्रभावक्षेत्र असलेले युद्धजन्य जाफना व पूर्व प्रांतातील त्रिंकोमाली येथेही मोदी जाण्याची शक्यता आहे.  
मोदी यांनी जाफना येथे भेट दिली तर ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील, असे सेनरत्ने यांनी सांगितले. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी गेल्या आठवडय़ात भारताचा दौरा केल्यानंतर लगेचच महिनाभरात मोदी श्रीलंकेस जात आहेत.