पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये सोमवारी फोनवरुन चर्चा झाली. व्यापारी तूट भरुन काढण्यासह अफगाणिस्तानात सहकार्य वाढवण्यासंबंधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. वर्ष २०१९ मध्ये भारत-अमेरिका रणनितीकसंबंध अधिक बळकट करण्याचा दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतला.

अमेरिकेच्या भारताबरोबरच्या व्यापारात तूट आहे. ही तूट भरुन काढण्यासंबंधी काय करता येऊ शकते यासंबंधी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. व्हाईटहाऊसकडून ही माहिती देण्यात आली. ट्रम्प प्रशासनाने भारतातून आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर शुल्क आकारले आहे. व्यापारी तूट कमी करणे आणि अमेरिकेत रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.

भारतानेही अमेरिकेला अशाच प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवर १४ हजार अमेरिकन सैनिक आहेत. त्यातील पाच हजारपेक्षा जास्त सैनिकांना माघारी बोलवण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. मागच्या आठवडयात ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील भारताच्या भूमिकेवरुन मोदी यांची खिल्ली उडवली होती. अफगाणिस्तानात लायब्ररी उभारणीसाठी भारताने निधी दिला त्या मुद्दावरुन त्यांनी मोदी यांची खिल्ली उडवली. अफगाणिस्तानात बांधलेली ही लायब्ररी कोणाच्याही उपयोगाची नाही असे ट्रम्प म्हणाले होते.

एकूणच भारत आणि अन्य शेजारी देश अफगाणिस्तानच्या सुरक्षेमध्ये फारसे योगदान देत नाहीत असे ट्रम्प यांना म्हणायचे होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या आरोपांवर भारताने उत्तर दिले. विकासामध्ये सहकार्य अफगाणिस्तानच्या परिवर्तनामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकते. भारत अफगाणिस्तानमध्ये अनेक मोठया इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांवर काम करत आहे तसेच अफगाण जनतेच्या गरजेनुसार सामुदायिक विकासाचे कार्यक्रम राबवत आहे असे भारताने सांगितले.