पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा असे आवाहन केले. करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळेच आपण सर्वांनी रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सगळे लाइट्स बंद करुन घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये एक दिवा, मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावावेत, अशा शब्दांमध्ये मोदींनी हे आवाहन केले.

मोदींच्या या आवाहनानंतर अनेक चर्चांना उधाण आले. मोदींनी ९ या अंकाचा आपल्या व्हिडीओ संदेशात बराच वापर केला. त्याबाबतही अनेक चर्चा रंगल्या. चला पाहूया पंतप्रधान मोदींचे भाषण आणि ‘९’ अंकांचं कनेक्शन…

व्हिडीओ संदेशाची वेळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ संदेश देण्यासाठी सकाळी ९ वाजताची वेळ निवडली.

देशवासीयांकडून मागितलेला कालावधी – मोदी यांनी संदेशात सर्व भारतीयांकडून देशासाठी ९ मिनिटे मागितली.

संदेश देण्याचा दिवस – आज, ३ एप्रिलला मोदी यांनी व्हिडीओ संदेश दिला. आजचा दिवस हा लॉकडाउनचा ९ वा दिवस आहे.

आवाहन पूर्ण करण्याचा दिवस – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी लाइट बंद ठेऊन दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. ५ एप्रिल म्हणजेच तारीख ५ आणि महिना चौथा. त्यामुळे यांची बेरीज केल्यास ५ + ४ = ९ होते.

आवाहनाच्या दिवसाचा लॉकडाउनशी संबंध – २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे ५ एप्रिलपासून मोजल्यास १४ एप्रिल हा ९ वा दिवस येतो.

आवाहन काय केले? – पंतप्रधान मोदी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा असे आवाहन केले. म्हणजेच जेव्हा लोक हे कार्य पूर्ण करतील, तेव्हा घड्याळात ९ वाजून ९ मिनिटे झाली असतील.

पंतप्रधान मोदी यांनी आज केलेल्या भाणषात ९ या अंकाचा बऱ्यापैकी वापर होता. त्यामुळे याबाबत अंकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञांकडून इतरही काही गोष्टी बोलल्या आणि सांगितल्या जात आहेत. त्यामुळे आता जनता कर्फ्यूच्या दिवशी थाळीनाद करणारे भारतीय ५ एप्रिलला कशाप्रकारे मोदी यांना पाठिंबा दर्शवतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.