देशाच्या वेगवेगळया भागात पुन्हा एकदा करोना व्हायरसचे रुग्ण वाढू लागले आहेत. सध्या तरी लस हाच या आजारातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. करोनामध्ये मनुष्यहानी बरोबर वित्तहानी सुद्धा मोठया प्रमाणावर होतेय. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करावे लागते, त्यामध्ये नागरिकांचे आर्थिक नुकसान देखील तितकेच होते. त्यामुळे लस कधी येणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोना लशीची निर्मिती सुरु असलेल्या तीन प्रकल्पांना भेट देणार आहेत. मोदींनी सर्वप्रथम अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली. इथे झायकोव्ही-डी लशीची निर्मिती सुरु आहे. ही स्वदेशी लस आहे. पंतप्रधान मोदींनी आज इथे स्वत:हा भेट देऊन लस निर्मिती आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला आहे.

“आज अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कचा दौरा करुन, स्वदेशी DNA आधारीत लशीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचे मोदींनी कौतुक केले. या प्रवासात भारत सरकार त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे” असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. मोदींनी लस निर्मितीचे काम समजून घेताना झायडसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशिल्ड लस तयार करण्यात येत आहे.