अर्थव्यवस्था सुधारणेसाठी पंतप्रधान मोदींचे आवाहन
‘देशाच्या अर्थव्यवस्थेने तळ गाठला आहे. अर्थव्यवस्थेचा घसरलेला गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी कठोर निर्णय घेणे अत्यावश्यक असून येत्या एक-दोन वर्षांत त्या दिशेनेच प्रयत्न केले जातील’, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या आगामी आर्थिक धोरणाचे संकेत दिले. येथे भाजप कार्यकर्त्यांशी ते बोलत होते.
विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य नौदलात दाखल करण्याच्या सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी शनिवारी गोव्यात आले होते. या वेळी मोदींनी गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. ते पुढे म्हणाले की, ‘मी अशा काळात पंतप्रधानपद स्वीकारले आहे की, अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आधीच्या सरकारने काहीही केलेले नाही. त्यामुळे नवीन सरकारवर त्याचा बोजा पडला आहे. परिणामी येत्या एक-दोन वर्षांत आपल्या सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. अर्थव्यवस्था सुधारणेसाठी हे आवश्यक असून कदाचित देशवासीयांच्या रोषाला मला सामोरे जावे लागेल. परंतु घेतलेल्या निर्णयानंतरचे परिणाम दिसू लागल्यानंतर पुन्हा लोकांचे प्रेम मला मिळेल.’ केवळ माझ्या नावाचा गजर करून देशापुढील समस्या सुटणार नसून त्यासाठी आर्थिक भान ठेवणे गरजेचे असल्याचेही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले..
’सरकारमधील लोकांना देशासाठी काही करायचे नसते ही धारणा चुकीची आहे
’लोकसभा निवडणुकीतील यश केवळ आकडय़ांचा खेळ नाही; त्यात लोकभावना आहेत
’देशातील युवावर्गाला सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांची पूर्तता करायची आहे
’सरकार लोकाभिमुख काम करेल तसेच सत्तेचा वापर जनकल्याणासाठीच केला जाईल
’देशासाठी कठोर निर्णय घेण्याची हीच वेळ असून पक्षकार्यकर्त्यांनी त्यात साथ द्यावी