गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्याही त्या प्रमाणात वाढवणं आवश्यक असल्याचं मत यापूर्वी अनेकांनी व्यक्त केलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उद्या (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांच्या हस्ते आयसीएमआरच्या अत्याधुनिक चाचणी केंद्रांचं उद्धाटन करण्यात येणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी या केंद्रांचं उद्धाटन करणार आहे. तसंच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित असणार आहेत.

कोलकात्यात आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड अँट्रिक डिजिज हे पहिलं चाचणी केंद्र, नॉएडामध्ये आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेंट अँड रिसर्च सेंटर येथे दुसरं तर मुंबईत आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या ठिकाणी तिसरं चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

या तिन्ही चाचणी केंद्रांमध्ये दररोज १० हजारांपर्यंत करोनाच्या चाचण्या करता येणार आहेत. तसंच याव्यतिरिक्त या केंद्रांमध्ये अन्य आजारांच्या चाचण्याही करता येणार आहे. यामध्ये हेपेटायटिस बी आणि सी, एचआयव्ही, टिबी, डेंग्यू यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसंच त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील सहभागी होणार आहे.

देशात रविवारी करोनाबाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ वर पोहोचली होती. तर आतापर्यंत ८ लाख ८५ हजार ५७७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ३२ हजार ०६३ रुग्णांचा करोनामुळे मृच्यू झाल्याची माहिती समोर आली होती.