पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या चीन दौ-यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर त्यांची अनेक महत्वाच्या विषयांवर आश्वासक चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाच्या मुद्यांवर एकमत झाले असून यामध्ये सीमेवर शांतता ठेवण्याच्या विषयाचा समावेश आहे. लष्करी संघर्ष टाळण्यासाठी यापुढे दोन्ही देश रणनितीक संवाद वाढवण्यावर भर देणार आहेत.

भारत-चीन सीमेवर शांतता, सौहार्द टिकून राहण्यात दोन्ही देशांचे हित आहे. त्यामुळे यापुढे दोन्ही देशांच्या लष्करामध्ये विश्वासाचा पूल तयार व्हावा, संवाद वाढवण्याठी रणनितीक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सीमेवरील संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी दोन्ही नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फक्त लष्करीच नाही अन्य क्षेत्रांमध्येही भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले आहे.

भारत-चीनमध्ये सीमावादही आहे. हा प्रश्नही परस्पर सहमतीने सोडवण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. मतभेद असले तरी दोन्ही देश परिपक्व असून शांततेच्या मार्गाने चर्चा करुन वादावर तोडगा काढावा असा दोन्ही नेत्यांचा दुष्टीकोन आहे असे विजय गोखले यांनी सांगितले. या अनौपचारिक शिखर परिषदेत कुठल्याही करारावर स्वाक्षरी झाली नाही किंवा घोषणा झाली नाही फक्त द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. डोकलामच्या संघर्षापासून भारत-चीन संबंधात निर्माण झालेला कडवटपणा संपवणे हा मोदी-जिनपिंग यांच्या भेटीमागे उद्देश होता.