देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि बडे उद्योजक रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सध्याच्या करोना महामारीच्या काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न हे वरवरचे आणि दिखावू नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. असोचेम फाउंडेशन वीकच्या संमेलनात ते बोलत होते.

रतन टाटा म्हणाले, “मी आजवरच्या व्यावसायिक कार्यकाळात साथीच्या आजाराची सर्वात भयनाक परिस्थिती यंदा पाहिली. महामारीचा काळ आणि देशाची आर्थिक पातळीवर घसरण झालेली असताना पंतप्रधानांनी केलेल्या कार्याचा मला आदर वाटतो. कारण या काळात तुमचे नेतृत्व अढळ राहिले, तुम्ही दुजाभाव केला नाही, तुम्ही जबाबदाऱ्या झटकल्या नाहीत, तुम्ही पुढे राहून देशाचे नेतृत्व केले.” महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक कार्याची दुसऱ्यांदा देशातील एका बड्या उद्योजकानं दखल घेतली आहे. यापूर्वी आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी मोदींचे करोना काळातील नेतृत्वाचे आणि कामाचे कौतुक केले होते.

“तु्म्ही लॉकडाउन लागू केला, काही मिनिटांसाठी तुम्हाला देशानं दिवे बंद करावे असं वाटत होतं. तुम्ही यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यामध्ये वरवरचं वाटणं आणि दिखाऊपणा नव्हता, देशानं एकत्र यावं हाच यामागील उद्देश होता,” असेही रतन टाटा म्हणाले.

विषाणूच्या नियंत्रणामुळे एप्रिल-जूनमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत २३.९ टक्के घट झाली आणि त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ७.५ टक्के घट झाली. देशातील सर्वात गरीब लोकांना मोफत अन्न आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी वित्तीय पाठबळात वाढ होत असताना तिला चालना देण्यासाठी आणि पतपुरवठा वाढविण्यासाठी भारत सरकारने अनेक उपाय केले. मोदी सरकारने याच काळात कामगार सुधारणांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच शेतीविषयक सुधारणांचा मार्ग धरला. तर भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी १० हून अधिक क्षेत्रांच्या उत्पादनाशी जोडलेली प्रोत्साहन देणारी धोरणे तयार केली, असेही टाटा यावेळी म्हणाले.

आता या नेतृत्त्वाचे फायदे उद्योग जगताने दाखवायला हवेत – टाटा

“या नेतृत्त्वाचे फायदे दाखवून देणे हे आता उद्योग म्हणून आपलं काम आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही असे करुन दाखवू. गेल्या काही वर्षांत मी पाहिले आहे की, आपण एकत्रित एकत्र येत असताना प्रचंड गोष्टी करतो. त्यामुळे या कठीण काळात जर आपण सर्वजण एकत्र उभे राहिलो आणि आपण मोदींनी जे सांगितलं त्याप्रमाणे वागलो तर जग म्हणेल की या पंतप्रधानांनी जसं सांगितलं तसं घडून आलं,” अशा शब्दांत रतन टाटा यांनी पंतप्रधान मोदींचा गौरव केला.