पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांना वार्षिक पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपयेही देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मोदींच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शेतकरी हिताचा हा निर्णय घेतला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर इतर कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांनाही शपथ देण्यात आली. या सगळ्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत आता सगळ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजना ही फक्त देशातल्या कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांसाठीच लागू करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने जो जाहीरनामा आणला होता त्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सगळ्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात येईल असं वचन देण्यात आलं होतं. त्यामुळे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने हे आश्वासन पूर्ण केले आहे. या योजनेचा लाभ देशाल्या १४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करू अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपयांचा सन्मान निधी मिळणार आहे.

आत्तापर्यंत १२.५ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. फक्त २ कोटी शेतकरी यापासून वंचित होते. आता या घोषणेनंतर सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. या योजनेवर आधी ७५ हजार कोटी इतका खर्च होत होता जो वाढून आता ८७ हजार कोटी इतका होणार आहे असेही तोमर यांनी सांगितले.

यावेळी तोमर यांनी शेतकरी आणि लघू उद्योजकांसाठी पेन्शन योजनाही लागू केली. या योजनेनुसार, १८ ते ४० वर्षे वयाच्या शेतकरी आणि लघू उद्योजकांना वयाच्या ६० वर्षी दर महिन्याला ३ हजार रूपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेसाठी १० हजार कोटींचा खर्च होणार असल्याचंही तोमर यांनी सांगितलं.