पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी एका वकील महिलेने केली आहे. मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन केल्याचा दावा वकील रमा विठ्ठलराव काळे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या काळे यांनी या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली आहे. मोदी यांनी घटनेचा अपमान केल्याचे काळे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ५६ मिनिटांच्या भाषणात अनेकदा भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा केला. घटनेच्या पहिल्या कलमानुसार देशाचे नाव भारत आणि इंडिया असे आहे. तसा स्पष्ट उल्लेख पहिल्या कलमात आहे. घटनेमध्ये कुठेही देशाचे नाव म्हणून हिंदुस्तानचा उल्लेख नाही. हिंदुस्तान या शब्दामधून एका विशिष्ट धर्माचा उल्लेख होतो,’ असे काळे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. मोदींनी १२५ कोटी लोकांना संबोधित करताना देशाचा उल्लेख हिंदुस्तान म्हणून करणे हा घटनेचा अपमान आहे, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

‘मोदींचे भाषण देशातील १२५ कोटी जनतेने ऐकले. याशिवाय जगभरातील अनेकांनीही मोदींचे भाषण ऐकले. कोट्यवधी लोकांसमोर बोलताना, देशाला संबोधित करताना भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा करणे अपमानास्पद आहे. त्यामुळे देशावर प्रेम असणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’ असा दावा काळे यांनी त्यांच्या तक्रारीत केला. ‘पंतप्रधान म्हणून भाषण करताना मोदींनी बेजबाबदार विधान केले. देशाचा उल्लेख हिंदुस्तान असा करुन मोदींनी घटनेच्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या विधानामुळे घटनेचा अपमान झाला आहे,’ असे काळे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी असल्याने काळे यांनी या प्रकरणी त्यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे. ‘मोदींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,’ अशी थेट मागणी काळेंनी केली आहे. ‘घटनेचा सन्मान करणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे. घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी पंतप्रधानांकडे असते. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मोदी यामध्ये अपयशी ठरले,’ असे त्यांनी म्हटले आहे.