काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांची बैठक झाली होती असा आरोप गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे वक्तव्य पूर्णपणे निराधार असल्याची स्पष्टोक्ती पाकिस्तानचे माजी मंत्री खुर्शीद कसूरी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांना काहीही अर्थ नाही. त्यांचे आरोप म्हणजे एखाद्या काल्पनिक कथेप्रमाणे आहेत. जेवणाचे म्हणाल तर होय मी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासोबत स्नेहभोजन केले. मात्र त्यावेळी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी सैन्यदल प्रमुख दीपक कपूर, चार परराष्ट्र सचिव आणि पाकिस्तान आणि भारताचे राजनैतिक अधिकारी इतके सगळे हजर होते. आता मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा प्रश्न विचारायचा आहे की माझ्यासोबत तेव्हा तिथे असलेल्या सगळ्या लोकांवर ठपका ठेवणार का?

याआधी चुकीचे आरोप केल्याबद्दल माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी असे म्हटले होते. मात्र आता पाकिस्तानचे माजी मंत्री कसूरी यांनी तर हे सगळे आरोप खोडून काढले. गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे खोटे आरोप केल्याचा दावा कसूरी यांनी केला. एवढेच नाही तर रॉ या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाला मी मागे एका कार्यक्रमात भेटलो होतो. या भेटीवरूनही तुम्ही वाद निर्माण करणार का? असाही प्रश्न कसूरी यांनी विचारला.

काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पातळी सोडून टीका केली होती. त्यानंतर हा सगळा वाद समोर आला होता. आता खुर्शीद यांनी केलेल्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.