प्रसार माध्यमांमध्ये आणि समाजिक व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख अतिशय दुर्मिळ राहीला आहे. पत्नी जशोदाबेन यांच्यासोबत गेली अनेक वर्षे राहत नसल्यामुळे खुद्द मोदींनीही आपल्या वैवाहिकतेच्या मुद्दयावर जाहीररित्या बोलणे कधीही पसंत केलेले नाही.
परंतु, जशोदाबेन मात्र आपल्या वैयक्तीक आयुष्यात एका पारंपारिक भारतीय महिलेप्रमाणेच पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुषासाठी पार्थना करताना दिसतात.
नुकतेच जशोदाबेन यांनी उत्तर गुजरातमधील अंबाजी धाम शक्तीपीठात जाऊन मोदींच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी प्रार्थना केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, जशोदाबेन यांनी मोदींनी तयारी दर्शविली तर, त्यांच्यासोबत या शक्तीपीठात जाऊन प्रार्थना करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. परंतु, काहीकारणास्तव हा योग जुळून आला नाही. तरीही मोदींनी निकाल जाहीर होण्यापूर्वी या शक्तीपीठाला भेट दिली होती. आता जशोदाबेन यांनी आपल्या कुटुंबियांसोबत अंबाजी शक्तीपीठात जाऊन प्रार्थना केली.
उत्तर गुजरातमध्ये असलेल्या या शक्तीपीठाला आजवर अनेक बड्या व्यक्तींनी भेट देऊन प्रार्थना केली आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री कोकीलाबेन यांनी या शक्तीपीठात जाऊन प्रार्थना केली होती.