काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीने करोना संकटाच्या सदोष हाताळणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आणि त्यांनी चुकांबद्दल प्रायश्चित्त घ्यावे, अशी मागणी केली.

पंतप्रधान मोदी यांनी आपला वैयक्तिक कार्यक्रम राबवण्याऐवजी झालेल्या चुकांबद्दल प्रायश्चित्त घ्यावे आणि नागरिकांच्या दु:खाची जाणीव ठेवून त्यांची सेवा करावी, असा ठराव काँग्रेसच्या कार्यकारी समितीने केला.

सरकार जाहीर करीत असलेले करोना रुग्णांचे आकडे आणि मृतांची संख्या याबद्दलही या ठरावात शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्याचबरोबर मृतांचे खरे आकडे जाहीर केले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ‘आव्हानांशी सामना करण्यात उपाय सामावलेला असतो, मृतांचे आकडे आणि रुग्णांची संख्या दडवून सत्य लपवण्यात नाही,’ असा टोलाही ठरावात लगावण्यात आला आहे.

केंद्राच्या लसीकरण धोरणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना लशींचा पुरवठा अत्यंत अपुरा असून लशींच्या किमतीबद्दलचे धोरण अपारदर्शक आणि भेदभाव करणारे होते, असा आरोपही काँग्रेसच्या कार्यकारिणीने केला.

काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सूरजेवाला म्हणाले, की ही वेळ राष्ट्रीय एकात्मता, संकल्प आणि आपल्या उद्दिष्टांप्रति दृढ भावना दर्शवण्याची आहे. मृतांची आकडेवारी अत्यंत चुकीची असून त्यात मृत्यूची मोठय़ा प्रमाणावर नोंदच केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

करोना साथीची दुसरी लाट कोणत्याही गंभीर आपत्तीपेक्षा कमी नाही आणि मोदी सरकारच्या असंवेदनशील, उदासीन, अक्षमतेचा तो परिणामआहे, असा आरोपही दोन्ही नेत्यांनी केला. मोदी सरकारच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमाच्या धक्कादायक कृतीबद्दल काँग्रेस कार्यकारिणीने खेद व्यक्त केल्याचेही सूरजेवाला यांनी सांगितले.

लसीकरण मोहीम व्यापक करण्याची आणि आवश्यक औषधे, प्राणवायू पुरवठा सुरळीत करण्याची गरज असताना मोदी सरकार ‘सेंट्रल व्हिस्टा’सारख्या व्यक्तिगत प्रकल्पांवर खर्च करण्याचा गुन्हा करीत असल्याची टीकाही काँग्रेस कार्यकारिणीने ठरावात केली आहे.

पराभवाच्या मूल्यमापनासाठी समिती

विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाचे मूल्यमापन करण्यासाठी सोनिया गांधी यांनी समिती प्रस्तावित केली असून ती ४८ तासांत स्थापन करण्यात येईल. ही समिती लवकरच आपला अहवाल कार्यकारिणीला सादर करेल, असेही पक्षाचे नेते सूरजेवाला यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित

नवी दिल्ली : करोना परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीने सोमवारी एकमताने घेतला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २३ जूनला घेण्याचा प्रस्ताव होता; परंतु देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असताना निवडणूक घेणे सयुक्तिक ठरणार नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे.

विशेष अधिवेशनाची काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली : करोनास्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे सोमवारी केली. करोनामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांचे जीवन सुसह्य़ करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेणे महत्त्वाचे आहे. करोना संकट हाताळण्यासाठी राष्ट्रीय उपाययोजना करण्याची गरज आहे, असे चौधरी यांनी पत्रात नमूद केले आहे.