परीक्षेचा कालावधी हा उत्सवांप्रमाणे साजरा केल्यास विद्यार्थ्यांवर दबाव येणार नाही असे नमूद करत आईवडिलांनीच यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आराम, झोप आणि व्यायाम या तीन गोष्टी परीक्षेच्या काळात महत्त्वाच्या आहेत असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. मन की बात या कार्यक्रमाचा हा २८ वा भाग होता. नववर्षातील मोदी पहिल्यांदात मन की बातमधून संवाद साधत असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांविषयी मोदींनी भाष्य केले.गूण आणि गूणपत्रिका याचा उपयोग मर्यादित आहे, जीवनात तुम्हाला ज्ञान आणि कौशल्य कामी येणार असल्याचे मोदींनी नमूद केले. जीवनात स्वतःशी स्पर्धा करा, दुस-यांशी स्पर्धा करणे टाळा असे सांगताना मोदींनी सचिन तेंडुलकरचा दाखलाही दिला. सचिनने नेहमी स्वतःलाच आव्हान दिले आणि यातून तो विक्रमांचे नवनवीन शिखर गाठू लागला याकडेही मोदींनी लक्ष वेधले.

पालकांनी मुलांवर आशेचे ओझे लादू नये. याऊलट त्यांचा स्वीकार करावा असे त्यांनी सांगितले. परीक्षेच्या कालावधील कॉपीसारख्या गैरप्रकारांवरही मोदींनी भाष्य केले. मोदी म्हणाले, कॉपी करताना कोणी पकडले नाही तरी तुम्हाला माहित असते की तुम्ही कॉपी केली आहे. त्यामुळे कॉपीसारख्या गैरप्रकाराकडे वळू नका असे आवाहन त्यांनी केले. तुम्हाला एकदा कॉपीची सवय लागली की शिकायची इच्छा संपेल. कॉपी करण्यासाठी वेळ खर्च करण्याऐवजी आणि नवनवीन शक्कल लढवण्याऐवजी हाच वेळ आणि बुद्धी चांगल्या कामासाठी खर्च करा असे मोदींनी सांगितले. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे, या दिवशी सर्वांनी देशातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करावी असे आवाहन त्यांनी केले.

Live Updates
11:25 (IST) 29 Jan 2017
आत्मविश्वासाच्या अभावामुळे विद्यार्थी कॉपीसारख्या प्रकाराकडे वळतात - मोदी
11:24 (IST) 29 Jan 2017
सचिन तेंडुलकरच्या यशोगाथेकडे बघा, त्याने नेहमी स्वतःलाच आव्हान दिले आणि यातून तो विक्रमांचे नवनवीन शिखर गाठू लागला – मोदी
11:24 (IST) 29 Jan 2017
स्वीकार, शिकवणे आणि वेळे देणे या तीन गोष्टींवर पालकांनी भर द्यावा - मोदी
11:20 (IST) 29 Jan 2017
जीवनात स्वतःशी स्पर्धा करा, दुस-यांशी स्पर्धा करणे टाळा - मोदी
11:19 (IST) 29 Jan 2017
गूण आणि गूणपत्रिका याचा उपयोग मर्यादित आहे, जीवनात तुम्हाला ज्ञान आणि कौशल्य कामी येणार आहे - मोदी
11:18 (IST) 29 Jan 2017
आई वडिलांनी परीक्षेच्या कालावधीत घरात उत्सवासारखे वातावरण राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे - मोदी
11:17 (IST) 29 Jan 2017
परीक्षकडे दबावाच्या दृष्टीकोनातून बघू नका, परीक्षेचा कालावधी हा उत्सवासारखा साजरा केला पाहिजे - मोदी
11:15 (IST) 29 Jan 2017
परीक्षेच्या कालावधीला आपण तणाव आणि निराशेचा काळ म्हणून का बघतो ? - मोदी
11:15 (IST) 29 Jan 2017
३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे, या दिवशी सर्वांनी देशातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करावी - मोदी