सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनलॉक २ ची घोषणा केली. “अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला आहे,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असल्याचंही म्हटलं.

आणखी वाचा- सरपंच असो किंवा पंतप्रधान नियमांपेक्षा कोणीही मोठा नाही – नरेंद्र मोदी

“करोनाशी लढताना आपण अनलॉक २ मध्ये प्रवेश करत आहोत. तसंच आपण त्या वातावरणातही प्रवेश करतोय ज्या वातावरणात सर्दी, खोकला, ताप यासारखे अनेक आजार वाढतात. अशा काळात सर्वांनी आपली काळजी घ्यावी. करोनामुळे होणारा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे. वेळेवर केलेल्या लॉकडाउनमुळे आणि अन्य निर्णयांमुळे लोकांचं जीवन वाचवण्यात आपण यशस्वी ठरलो,” असं मोदी म्हणाले.

आणखी वाचा- ३० नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

“जेव्हापासून अनलॉक १ सुरु झालं तेव्हापासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत आपण मास्क, दो गज की दुरी, हात धुण्यासारखे सर्व प्रकार करत होतो. पण जेव्हा याची अधिक गरज आहे तेव्हा हा निष्काळजीपणा करणं चिंताजनक आहे. पुन्हा जुन्या प्रकारे आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्याला कंटेन्मेंट झोनवर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. जे नियमांचे पालन करणार नाही त्यांना त्यापासून थांबवावं लागेल आणि सांगावं लागेल, तसंच समजवावंही लागेल, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- मास्क न घातल्यामुळे १३ हजारांचा दंड : मोदींच्या भाषणात उल्लेख झालेले पंतप्रधान कोणत्या देशाचे??

“लॉकडाउनच्या काळात नियमांचं गंभीरतेनं पालन केलं गेलं. आता सरकारी अधिकारी, संस्थांना देशातील नागरिकांना तशाच प्रकारे नियमांचं पालन करून घ्यावं लागणार आहे. त्याच जबाबदारीनं वागावं लागणार आहे,” असंही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं.

गरीबांना मोफत धान्य

३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली . याचा लाभ देशातल्या ८० कोटी जनतेला होणार आहे असंही ते म्हणाले. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार असल्याचं म्हणत त्यांनी प्रामाणिकपणे त्यांनी कर भरला त्यांचे आभारही मानत असल्याचे मोदी म्हणाले.