“कौशल्य म्हणजे केवळ दोन वेळची रोजी रोटी आणि पैसे कमवायचं साधन नाही तर जीवनात उत्साह निर्माण करण्याचंही साधन आहे,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी देशातील जनतेला मार्गदर्शन केलं. करोना संकटाच्या काळातही जागतिक संस्कृती आणि नोकरीचं स्वरूपही बदललं असून आता त्यावर तंत्रज्ञानाचाही प्रभाव दिसत असल्याचे ते म्हणाले.

“कौशल्याची ताकद माणसाला एका उंचीवर पोहोचवू शकते. कौशल्याच्या जोरावर कोणतीही संधी न दवडणं हीच एका यशस्वी व्यक्तीची निशाणी आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले. “कौशल्य ही तरूणांची सर्वात मोठी शक्ती आहे आणि बदलत्या पद्धतींमुळे कौशल्यही बदललं आहे. आज तरूण वर्ग नवनव्या गोष्टींचा अवलंब करतो. आजचा दिवस हा २१ व्या शतकातील तरूणांना समर्पित असल्याचेही ते म्हणाले.

“आपल कौशल्य अधिक बळकट करणं हाच करोना संकटात पुढे जाण्याचा मंत्र आहे. आपल्याला नेहमीचं नवं कौशल्य शिकावं लागणार आहे. तसंच प्रत्येक यशस्वी व्यक्तीला त्यांच्या कौशल्यात सुधारणा करण्याची संधी मिळाली पाहिजे,” असंही मोदी यावेळी म्हणाले. ज्या व्यक्तीच्या कौशल्याबाबत आकर्षण आहे त्यांच्या जीवनाला कायम ताकद मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.