बिहारच्या रणमैदानात घराणेशाहीच्या आरोपाचे अस्त्र

छाप्रा, समस्तीपूर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा घराणेशाहीच्या आरोपाचे अस्त्र चालविले. विशेषत: राजदचे युवानेते तेजस्वी यादव  आणि काँग्रेसनेते राहुल गांधी यांना त्यांनी एकाचवेळी लक्ष्य केले.

मोदी म्हणाले की, ‘बिहारमधील पूर्वीची राजद व काँग्रेसची राजवट ही दोन युवराजांची होती असे म्हणायला हरकत नाही. त्यांचा उद्देश केवळ त्यांच्या खुच्र्या सुरक्षित ठेवण्याचा होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मात्र विकासाचे इंजिन दुप्पट ताकदीने चालवले. दुसरीकडे युवराजांच्या दुकलीने सिंहासनाचे राजकारण केले.’

‘एक युवराज उत्तर प्रदेशात सपशेल हरले आहेत व आता जंगल राज निर्माण करणाऱ्या दुसऱ्या युवराजांना पाठिंबा देत आहेत. ते आता पुन्हा अपयशी ठरणार आहेत. समाजवादी पक्ष व काँग्रेस यांची युती उत्तर प्रदेशात २०१७ मधील विधानसभा निवडणुकांत अपयशी ठरली तशीच बिहारमध्ये काँग्रेस व राजदची अवस्था होणार आहे.’ असे त्यांनी सांगितले.

समस्तीपूर  येथील सभेत ते म्हणाले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकीकडे लोकशाही मानत असताना दुसरीकडे विरोधक घराणेशाहीचे राजकारण करीत आहेत.  मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा एकतरी नातेवाईक राज्यसभेवर आहे का,  मोदींचा एकतरी नातेवाईक संसदेत आहे का, असे त्यांनी विचारले.

‘राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी माजी केंद्रीय मंत्री रघुवंशप्रसाद सिंह यांचा अपमान केला. पक्षाचे संस्थापक सदस्य असूनही मृत्यूपूर्वी त्यांना  पक्ष सोडावा लागला होता, रघुवंश प्रसाद हे वैशाली जिल्ह्यातील आदरणीय नेते होते. छाप्रातील राजपूत समाज त्यामुळे नाराज आहे,’ असेही मोदी म्हणाले.

टाळेबंदीतील मदतीचा उल्लेख

छाप्रा येथील सभेत महिलांना उद्देशून मोदी म्हणाले की, ‘माता भगिनींनो छट पूजा कशी करणार याची काळजी करू नका. तुमचा पुत्र दिल्लीत बसलेला आहे. तुमच्या सर्व गरजांची तो काळजी घेईल. तुमचा पुत्रच कोविड १९ च्या आव्हानात्मक काळात तुमच्या चुली पेटत्या ठेवण्यासाठी काम करीत होता. छठ पूजेतही तुम्हाला कोणतीही कमतरता पडू देणार नाही. विरोधकांना निवडणुकीच्या वेळी गरिबांची आठवण येते. काँग्रेस पक्षाला सरदार पटेलांच्या जयंतीचा सोयीस्कर विसर पडला. सरदार पटेल संघाचे, जनसंघाचे की भाजपचे होते..यातील कुणाचेच नव्हते ते काँग्रेसचे नेते होते पण पक्षाने त्यांचे स्मरण ठेवले नाही.’

पुलवामा प्रकरणावरून बिहारी अस्मिेतेला साद

पाकिस्तानने पुलवामा हल्ला त्यांनीच घडवून आणल्याची कबुली दिल्याने बिहारच्या भूमिपुत्रांनी केलेल्या प्राणार्पणाची जराही काळजी नसलेल्या विरोधकांच्या चेहऱ्यावरचा बुरखा फाडला गेला आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभामंध्ये केली. ते म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी आमच्या शेजारी देशाने पुलवामा हल्लय़ात सामील असल्याची कबुली दिली त्यामुळे विरोधकांच्या चेहऱ्यावरचा बुरखा फाडला गेला आहे. याच विरोधकांनी बिहारमधील भूमिपुत्रांनी केलेल्या प्राणार्पणाची जाणीव ठेवली नाही. राजकीय फायद्यासाठी पुलवामा हल्लय़ावरही राजकारण केले. नंतर आम्ही बालाकोट येथे हवाई हल्ले केले त्याबाबतही या लोकांनी शंका घेतल्या. जे कुणी मते मागायला येतील त्यांना मत देताना या सगळ्या गोष्टी स्मरणात ठेवा.’