पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी उत्तर प्रदेशात निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांसोबत ब्रेकफास्ट केला. यावेळी त्यांनी पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून दिल्याबद्दल आमदारांचे आभार मानले. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते. या बैठकीचा नेमका तपशील अद्यापपर्यंत समजू शकलेला नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधानांनी आमदारांना भविष्यात अधिक मेहनत घेऊन काम करा व राज्यात भाजपला बळकट करा, असा सल्ला दिल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय संपादन केला होता. पंतप्रधान मोदींनी या विजयाचे वर्णन नवीन भारताच्या निर्माणाची नांदी असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, बुधवारी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रीपद वाटपात वरचष्मा राखला आहे. महत्त्वाचे असणारे गृह मंत्रालय आदित्यनाथ यांनी स्वत:कडे ठेवले आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा या गृह आणि महसूल खात्यासाठी आग्रही होते. मात्र ही दोन्ही महत्त्वाची खाती आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेली नाहीत. गृहखात्यासाठी आग्रही असलेल्या केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा देण्यात आली आहे. तर अर्थ मंत्रालयासाठी उत्सुक असलेल्या दिनेश शर्मा यांना शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थ खात्याची जबाबदारी राजेश अगरवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. खाते वाटप करताना वाद होऊ नयेत, यासाठी योगी आदित्यनाथ काल (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते.

विधानसभा निवडणुकीच्याआधी भाजपमध्ये दाखल झालेल्या काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रिटा बहुगुणा जोशी यांना महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच पर्यटन मंत्रालयाचा पदभारदेखील रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते सिद्धार्थ नाथ सिंह यांना आरोग्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मोहसीन रझा हा योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लिम चेहरा आहे. रझा यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती आणि तंत्रज्ञान, मुस्लिम वक्फ आणि हज विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुरेश खन्ना यांच्याकडे संसदीय कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सतीश महाना यांच्याकडे उद्योग मंत्रालयाची धुरा देण्यात आली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्याकडे कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे.

श्रीकांत शर्मा यांच्याकडे उर्जा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर २०१३ मधील मुझफ्फरनगर दंगलीवेळी सातत्याने वादात राहिलेल्या सुरेश राणा यांच्याकडे कृषी (ऊस) मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ आणि ४६ मंत्र्यांनी रविवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती.