‘टाइम’ नियतकालिकाने इंटरनेटवरील जगातील सर्वाधिक प्रभावशाली अशा ३० जणांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही नाव यादीत आहे.
सोशल मीडियावर असलेल्या अनुयायांची संख्या, त्यांच्याबद्दल माहिती पाहिली जाण्याचे प्रमाण आणि बातम्यांमध्ये राहण्याची र्सवकष क्षमता यांचे विश्लेषण करून ही यादी तयार करण्यात आली आहे. लोकप्रिय अशा ‘हॅरी पॉटर’ मालिकेचे ब्रिटिश लेखक जे. के. रोलिंग आणि टेलर स्वीफ्ट व ब्युयॉन्स या गायकांचाही यादीत समावेश आहे. ट्विटर आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुमारे ३ कोटी ८० लाख अनुयायी असून, यामुळे ते ओबामा यांचा अपवाद वगळता जगातील कुठल्याही नेत्यापेक्षा पुढे आहेत, असे ‘टाइम’ने म्हटले आहे. याशिवाय, भारताच्या २०० दक्षलक्षाहून अधिक ‘ऑनलाइन’ लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याकरिता सोशल मीडिया बहुमोल ठरू शकते, असे मोदी मानतात, याचाही या नियतकालिकाने उल्लेख केला आहे.
लोकांशी संवाद साधण्याकरिता सोशल मीडियाचा उत्साहाने वापर करणाऱ्या मोदी यांनी या वर्षी जानेवारी महिन्यातील ओबामांच्या भारत भेटीची घोषणा अपारंपरिक पद्धतीने केली. नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांमधून ही घोषणा करण्याचे टाळून त्यांनी त्यासाठी ट्विटरचा मार्ग निवडला, असे ‘टाइम’ने नमूद केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे फेसबुकवरील सगळ्यात आवडते आणि ट्विटरवरील ‘मोस्ट फॉलोड’ नेते आहेत. एवढेच नव्हे, तर ते या माध्यमातून आपला अ‍ॅजेंडाही मांडण्यास सक्षम आहेत, असे सांगताना या नियतकालिकाने ‘बझफीड’ या इंटरनेट मीडिया कंपनीने त्यांच्यावर तयार केलेल्या एका व्हिडीओचे उदाहरण दिले आहे. काही दिवसांतच हा व्हिडीओ ५ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला.
सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या या यादीत अभिनेते किम कर्दाशिन, गायक जस्टिन बेबर, अभिनेत्री ग्वेनेथ पॅल्ट्रो, चिनी अभिनेत्री याओ चेन, गायिका शकिरा इत्यादींचा समावेश आहे.