पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते यांची तुलना करण्याचा मोह केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना आवरला नाही. बोलण्याच्या भरात ते म्हणाले की, मिशीचे केस ते केवढेसे आणि शेपटाचे केस किती जास्त असतात. जशी मिशीची तुलना शेपटाशी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसची तुलना मोदींशी होऊ शकत नाही अशी चमत्कारिक सांगड तोमर यांनी घातली आहे.

केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाने काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. भाजपा राज्यघटना बदलेल, अशा स्वरुपाचे विधान अनंतकुमार हेगडे यांनी केले होते. यावरुन काँग्रेसने संसदेतही सत्ताधाऱ्यांची कोंडी केली होती. हा वाद ताजा असतानाच आता केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला. जशी मिशीची तुलना शेपटाशी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसची तुलना मोदींशी होऊ शकत नाही, असे ते म्हणालेत. मध्य प्रदेशमधील कोलारस येथील सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे होण्यासाठी काँग्रेस नेत्यांना आणखी बराच अवधी लागेल. २०१४ मधील निवडणुकीनंतर काँग्रेसची पिछेहाट सुरु झाली, असा दावाही त्यांनी केला. तोमर यांच्या विधानाने वाद निर्माण झाला असून वाचाळवीर नेत्यांमुळे भाजप पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

तोमर यांच्या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. भाजपमधील अनुभवी नेतेही असे विधान कसे करु शकतात हेच मला कळत नाही. खासदारांच्या प्रतिमेला यामुळे धक्का बसतो. पंतप्रधानांनी यावर स्पष्टीकरण द्यावे आणि खासदारांनी अशा स्वरुपाचे विधान करु नये यासाठी त्यांनी निर्देश द्यावे, अशी मागणी काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केली.