मात्र, दोन हजार, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा उद्यापासूनच चलनात

भारतातील काळा पैसा खणून काढू, असे आश्वासन देणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सध्या चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या, तसेच हजार रुपयांच्या नोटा मंगळवार मध्यरात्री १२ वाजल्यापासून तातडीने रद्द केल्या. मात्र, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा उद्या, गुरुवारी चलनात येणार असून, दोन हजार रुपयांच्या नोटाही लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहेत. स्वत नरेंद्र मोदी यांनीच मंगळवारी रात्री याबाबतची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी गोंधळाची परिस्थिती दिसून येत होती. मात्र, पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था निर्माण करण्यात आली असून, आवश्यक ती मुदतही देण्यात आल्याने नागरिकांनी हातघाईवर येऊ नये, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

मंगळवारी रात्री आठ वाजता पंतप्रधान दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून देशवासीयांशी संवाद साधला. सुमारे चाळीस मिनिटांच्या हिंदी व इंग्रजी भाषणात चलनी नोटांबाबतची घोषणा करून मोदी यांनी सगळ्यांना धक्का दिला.

तीन दिवस सवलत

पाचशे व हजारच्या नोटांच्या वापराबाबत तीन दिवस, म्हणजे शुक्रवार रात्रीपर्यंत काही सवलती देण्यात आल्या आहेत. सरकारी रुग्णालये, रेल्वे व बसस्थानके, पेट्रोलपंप, विमानतळ, विविध धर्मियांची अंत्यविधीस्थळे येथे या नोटा स्वीकारल्या जातील.

आज बँका, पतसंस्था बंद

याबाबतच्या प्रक्रियेची तयारी म्हणून आज, बुधवारी सर्व बँका बंद राहतील. राज्यातील पतपेढय़ाही आज बंद राहतील, अशी माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.

मात्र हे महत्त्वाचे..

पाचशे, हजारच्या नोटा रद्द झाल्या असल्या तरी बँकांमध्ये त्या जमा करण्यावर कुठलेही र्निबध नाहीत.

नोटा कशा, कुठे, कधी बदलता येतील?

देशातील सर्व बँका व टपाल कार्यालयांमध्ये १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या ५० दिवसांच्या काळात पाचशेच्या जुन्या नोटा जमा करता येतील. १० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या १५ दिवसांत नागरिकांना बँकांमधून जास्तीत जास्त चार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळतील. २५ नोव्हेंबरपासून पुढे ही मर्यादा चार हजार रुपयांपेक्षा अधिक असेल. ३० डिसेंबपर्यंत नोटा बदली करण्यास असमर्थ ठरलेल्यांना ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेच्या ठराविक कार्यालयांत विशिष्ट अर्ज भरून या नोटा बदलता येतील.

त्यासाठी काय आवश्यक? नोटा बदलून घेण्यासाठी सोबत आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड अशी कागदपत्रे दाखवून ओळख पटवावी लागेल.