चीन दौरा आटोपून मंगोलियात दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलिया संसदेला संबोधित केले. मंगोलियाच्या लोकशाहीला २५ वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी हे मंगोलियाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाला १ अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच, सुरक्षा, सायबर सुरक्षा, उर्जा अशा विविध मुद्यांवरील १४ करारांवर दोन्ही देशांनी रविवारी स्वाक्षरी केली आहे.  स्टेट पॅलेसमध्ये सैखानबिलेग यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी यांनी वरील घोषणा केली. मंगोलियासोबतचे संबंध ‘सर्वसमावेशक‘ ते ‘राजनैतिक भागीदारी‘पर्यंत वाढविण्यासाठी भारताने मंगोलियासाठी एक अब्ज डॉलरची पतरेषा जाहीर केली. मोदी म्हणाले की, मंगोलिया हा बुद्धाचा देश आहे. हा देश शांती, स्थिरता आणि समृद्धीला पुढे नेण्याचे काम करू शकतो. या देशाचा विकास स्तुत्य असून, येथे ‘सायबर सिटी’ उभारणार असल्याचे मोदी म्हणाले. आशियाई देशांनी जगाला खूप काही दिले आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यानंतर मोदींनी मंगोलियाच्या संसदेत भाषण केले. यावेळी मोदींनी दोन्ही देशांतील संबंध महत्त्वाचे असल्याचे म्हटले. भाषण संपण्यापूर्वी मोदींनी संसदेच्या सभागृहातील कमळाकडे बोट दाखवत हेच आपल्या पक्षाचे चिन्हं असल्याचे सांगितले.