विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वा लाख कोटी रुपयांची आर्थिक योजना जाहीर केली आहे. त्यावर निवडणुकीतील खडाजंगीत पहिली ठिणगी पडली असून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या योजनेवर टीका केली आहे.
मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीहून आल्यानंतर बिहारमध्ये दोन सभा घेतल्या, त्यात त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली. नितीशकुमार यांनी यूपीए सरकारकडे १२ हजार कोटींची मदत मागून बिहारची प्रतिष्ठा घालवली, असे मोदी म्हणाले. बिहारला बिमारू राज्य म्हटले जाते त्यावर नितीशकुमार यांना खिजवतानाच मोदी यांनी सव्वा लाख कोटींची आर्थिक योजना जाहीर केली. मोदी यांनी गेल्या निवडणुकीतच या मदतीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात त्यांनी काहीच केले नाही, अशी टीका नितीशकुमार यांनी केली होती. मोदी यांना सगळे जग स्वप्नात वावरते, असे वाटते, असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला.
आकडे आणि घोषणा..
मी आज आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आलो आहे, तुम्हाला किती हवेत.. ५० हजार कोटी, ६० हजार कोटी, ७० हजार कोटी, ८० हजार कोटी की ९० हजार कोटी असे नेहमीच्या पद्धतीने विचारत पंतप्रधान मोदी यांनी सव्वा लाखांची मदत जाहीर केली. केंद्र सरकार बिहारचे भवितव्य बदलण्यासाठी एवढी रक्कम खर्च करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले तेव्हा ‘मोदी.. मोदी’ अशा गर्जना झाल्या. या आर्थिक योजनेचा तपशील मात्र त्यांनी जाहीर केला नाही.