नवी दिल्ली : भारत आपल्या वीर जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही देतानाच, देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलांच्या सन्मानार्थ प्रत्येक भारतीयाने सणाच्या काळात आपल्या घरात दिवा पेटवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना केले.

रेडिओवरील या मासिक कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित करताना मोदी यांनी ३१ ऑक्टोबरच्या सरदार पटेल जयंतीचा दाखला देत देशात एकता राखण्याचे आवाहनही केले. देशाची एकता हीच शक्ती आणि प्रगती आहे. एकतेमुळेच देश सक्षम होऊन प्रगतीचे नवे शिखर गाठले जाईल, असे त्यांनी सांगितले.

सुमारे ३० मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी सैनिकांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा, योगदानाचा उल्लेख केला. आपण सण साजरे करीत असताना देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांची आठवण ठेवली पाहिजे. भारतमातेच्या सुरक्षेसाठी, सेवेसाठी ते सीमेवर पहाडासारखे उभे आहेत. भारतमातेच्या या सुपुत्रांच्या सन्मानासाठी आपण सणाच्या काळात आपल्या घरात एक दिवा प्रज्वलित केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. हे वीर जवान आपल्यापासून कितीही दूरवर असले तरी हा संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या खुशालीसाठी प्रार्थना करीत आहे, असे मोदी म्हणाले. जवानांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाचा त्यांनी उल्लेख केला. पूर्व लडाखमध्ये भारत-चीन यांच्यात संघर्षांची, तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांच्या सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

मोदी म्हणाले की, देशात अशा काही शक्तीही आहेत, ज्या लोकांच्या मनात संशयाचे बीज पेरून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचे कुहेतू हाणून पाडत देशाने त्यांना प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे. नागरिकांनी त्यांच्या प्रत्येक लहानशा कार्यातूनही सृजनशीलता आणि प्रेम दाखवून ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हे ब्रीद साध्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

देशवासीयांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देतानाच मोदी यांनी सणासुदीच्या काळात करोनाप्रतिबंधक निर्बंधांचे योग्य ते पालन करण्याचे आवाहन केले. अशा शुभप्रसंगी लोकांनी संयम बाळगून करोनाविरोधात खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले. आपल्यापैकी प्रत्येक जण तशा संयमाने वागत आहे. त्यामुळे करोनाविरोधातील लढाईत आपला विजय होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंदिरा गांधी यांचेही स्मरण

पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबरच इंदिरा गांधी यांचेही स्मरण केले. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ३१ ऑक्टोबर रोजी आहे. याच दिवशी सरदार पटेल यांची जयंती आहे. पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण गुजरातमधील केवाडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहोत, असे मोदी यांनी सांगितले.

देशाच्या एकतेसाठी आदि शंकराचार्य आणि भक्ती चळवळीने प्रेरणा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशाची एकता साधली, असे मोदी म्हणाले.

मल्लखांबासारखे स्वदेशी खेळ आता इंग्लंड, जर्मनी, पोलंड आणि मलेशियात लोकप्रिय होत आहेत, असे मोदी म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी तमिळनाडूतील थुतुकुडी येथील पोन मरियप्पन यांच्याशी संवाद साधला. त्यांनी आपल्या लहानशा केशकर्तनालयातील एका भागात वाचनालय सुरू केले आहे. अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेशातील फिरत्या वाचनालयांचेही मोदी यांनी कौतुक केले.

कृषी कायदे शेतकरी हिताचे

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. महाराष्ट्रातील एका कंपनीने मका उत्पादकांना केवळ पिकाचे पैसे दिले नाहीत, तर जादा बोनसही दिला, असे मोदी यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी हा सुखद धक्का आहे. कंपनीला याबाबत विचारले असता, नव्या कायद्यांमुळे शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतात आणि त्यांना जादा दर मिळू शकतो. याचा विचार करून आपण अतिरिक्त लाभ बोनसच्या रूपात दिला, असे कंपनीने सांगितले, असे मोदी यांनी निदर्शनास आणले.

स्वदेशी वस्तूंच्या खरेदीचा आग्रह

मोदी यांनी देशवासीयांना पुन्हा एकदा स्वदेशी वस्तूंबाबत आग्रही राहण्याचे स्मरण करून दिले. सणासुदीत खरेदी करताना याचे भान ठेवावे. खादीच्या वाढत्या लोकप्रियतेचा दाखला देत त्यांनी सांगितले की, आता संपूर्ण जग भारतीय उत्पादनांची दखल घेत आहे. मेक्सिकोतील ओक्साका येथे मार्क ब्राऊन या व्यक्तीने खादी हा एक ब्रॅन्ड म्हणून लोकप्रिय केला आहे. करोनाकाळात खादीच्या मुखपट्टय़ा लोकप्रिय झाल्या आहेत. दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील खादी केंद्रात गांधी जयंतीच्या दिवशी एकाच दिवसात एक कोटी रुपयांहून अधिक किमतीची खादी विकली गेली, याचा त्यांनी उल्लेख केला.