संघ नेतृत्व आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये विचारमंथन

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाताळणीवरून केंद्र सरकारवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर आणि उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेतृत्वामध्ये विचारमंथन सुरू झाले आहे. त्यात दोन्ही सरकारांची प्रतिमा सुधारण्याबाबत चर्चा केली जात आहे.

केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्यांची प्रतिमा सुधारण्यासंदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी सुनील बन्सल, संघाचे नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे या भाजप आणि संघातील वरिष्ठ नेत्यांमध्ये गंभीर चिंतन झाल्याचे समजते. या नेत्यांची दिल्लीत बैठक झाल्याचे सांगितले जात असले तरी, संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी अशी बैठक झाल्याचा इन्कार केला. दत्तात्रय होसबाळे दिल्लीत नसल्याने कोणतीही बैठक झाली नसल्याचे आंबेकर यांनी सांगितले. मात्र संघ आणि भाजपच्या नेतृत्वांमध्ये सुरू असलेल्या विचारमंथनात प्रामुख्याने तीन मुद्दे असून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी भाजपची संघटनात्मक तयारी आणि प्रतिमा सुधारणे, करोना साथीच्या हाताळणीसंदर्भात विरोधकांकडून केंद्रावर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देणे तसेच आरोग्य क्षेत्राच्या सक्षमीकरणाचा संभाव्य आराखडा तयार करणे अशा मुद्दय़ांवर चर्चा होत असल्याचे संघाशी संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आठ महिन्यांनी, फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तेथील करोना साथीची परिस्थिती हाताळणीबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनावर प्रसारमाध्यमांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गंगेच्या पात्रात शेकडो मृतदेह आढळणे आणि तेथेच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याच्या घटनांमुळे योगींच्या कार्यक्षमतेवरही शंका घेतली जात आहे.

सेवा म्हणजे संघटना!

जनतेमधील नाराजी दूर करण्यासाठी जनसंपर्काच्या मोहिमा आखल्या जाणार आहेत. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘सेवा म्हणजेच संघटना’ या मोहिमेला गती देण्यासाठी भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधील कार्यकर्त्यांना पत्रही पाठवले आहे.

दीर्घकालीन उपाययोजना

’करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. येत्या वर्षभरात या क्षेत्रात तातडीने उपाययोजना केल्या जातील.

’दीर्घकालीन सुविधा विकसित करण्यासाठी केंद्र आणि पक्षाच्या वतीने आराखडा तयार केला जाणार आहे.

’त्याद्वारे केंद्र सरकारची प्रतिमा

सुधारण्याचा उद्देश असल्याची माहिती संघाच्या निष्ठावानांकडून देण्यात आली.

विरोधकांना आक्रमक प्रत्युत्तर

विरोधकांच्या शाब्दिक हल्ल्यांना आक्रमक प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनावरून विरोधकांकडून होणारी टीका शेतकरी आंदोलनाच्या उदाहरणातून निष्प्रभ केली जाईल. मोदींच्या पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारावरून होणाऱ्या टीकेला अन्य पक्षांच्या नेत्यांनीही केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये प्रचारसभा घेतल्याचा मुद्दय़ाद्वारे प्रत्युत्तर दिले जाणार आहे.