अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या भेटीच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या आणि (महागडा असल्याने) वादग्रस्त ठरलेल्या मोनोग्राम अंकित सुटाने ‘लिलावात विकला गेलेला सगळ्यात महाग सूट’ म्हणून गिनेस बुकात स्थान मिळवले आहे.

या सुटाचा गेल्या वर्षी फेब्रुवारीत लिलाव करण्यात आला असता सुरतमधील हिऱ्यांचे व्यापारी आणि धर्मानंद डायमंड कंपनीचे मालक लालजी पटेल यांनी तो ४ कोटी ३१ लाख रुपयांना विकत घेतला होता.

या सुटाचा जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या गिनेस बुकात समावेश करण्यात आला ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. कंपनीच्या एचआर चमूच्या सूचनेवरील सुमारे पाच महिन्यांपूर्वी आम्ही या विक्रमी नोंदीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर दोन महिन्यांतच, हा लिलावात विकला गेलेला जगातील सर्वात सूट असल्याचे मान्य करणारे प्रमाणपत्र आम्हाला मिळाले, असे लालजीभाईंचे पुत्र हितेश पटेल यांनी शनिवारी सांगितले.

हा सूट तयार करण्यासाठी १० लाख रुपये खर्च आला होता आणि लिलावासाठी त्याची किमान किंमत ११ लाख रुपये ठेवण्यात आली होती. सुटाच्या लिलावातून मिळालेली रक्कम केंद्र सरकारच्या ‘क्लीन गंगा’ मोहिमेसाठी राखून ठेवण्यात आली आहे.

सोनेरी अक्षरांमध्ये ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ या नावाचे पट्टे असलेला हा सूट सध्या प्रेक्षकांना पाहण्यासाठी धर्मानंद डायमंड कंपनीच्या स्वागतकक्षातील एका काचेच्या केबिनमध्ये ठेवण्यात आला असल्याचे हितेश म्हणाले.

 

मोदी भारतीय पर्यटनाचा नवा चेहरा

नवी दिल्ली ; मे २०१४ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या देशांना भेटी दिल्या, तेथून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढल्याचा सरकारचा दावा आहे. यामुळे येत्या काळात लघु चित्रपट आणि माहितीपत्रके यांच्यावर मोदी हे भारतीय पर्यटनाचा चेहरा असणार आहेत.

पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे राजदूत असून ते जिथे-जिथे गेले तिथे त्यांनी भारताची प्रतिमा उजळली आहे. त्यामुळे भारतातील पर्यटन उद्योगाची जाहिरात करण्यासाठी आम्ही त्यांचा चेहरा वापरणार आहोत, असे पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

गेल्या काही महिन्यांत पर्यटन मंत्रालयाच्या जाहिरात आणि विपणन विभागाने या कामासाठी योग्य अशा चित्रपटसृष्टीतील चेहऱ्यासाठी भरपूर संशोधन केले.

मात्र, मे २०१४ पासून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ५ टक्क्य़ांनी आणि मोदी यांनी भेट दिलेल्या देशांमधून २० टक्क्य़ांनी वाढल्याचे आम्हाला आढळले. त्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचाच चेहरा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.