पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी भेदभाव करतात. त्यांची वर्तणूक पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखी असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे राजधानी दिल्लीत लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी केजरीवाल यांनी आंध्र भवन गाठले. त्यावेळी ते बोलत होते. नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनीही लखनौला रवाना होण्यापूर्वी नायडू यांची भेट घेतली.

ते म्हणाले, जेव्हा कोणी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा तो फक्त पक्षाचा मुख्यमंत्री नसतो तर संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. अशाच पद्धतीने पंतप्रधानही कुठल्या पक्षाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा असतो. ते विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी अशी वर्तणूक करतात. जसे ते भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, मोदींविरोधात आंध्र प्रदेशमध्ये रविवारी पोस्टर्सही लावण्यात आले होते. मोदी हे राज्य सरकारांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. यावेळी तृणमूल काँग्रेसचे डेरेक-ओ-ब्रायन, शरद यादव यांनीही नायडूंची भेट घेतली.

यावेळी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना पराभूत करण्याचे अपील केले.