हातात कुदळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या आपल्या मतदारसंघात शनिवारी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. गंगा नदीच्या तीरावर काढलेला गाळही त्यांनी भरला. उत्तर प्रदेशात हे अभियान सुरू ठेवण्यासाठी मोदी यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह नऊ जणांची नियुक्ती केल्याची घोषणाही केली.पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी शनिवारी आपला दौरा आटोपला. वाराणसीतील सर्वात जुन्या आसी घाट येथे त्यांनी स्वच्छता अभियान हाती घेतले.
गंगा नदी आणि घाटांमध्ये पसरलेले घाणीचे साम्राज्य दूर करण्याच्या मोहिमेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यासाठी आपण येथे आल्याचे मोदी यांनी सांगितले. एका महिन्यात सर्व घाट चकाचक करण्याचे आश्वासन सामाजिक संघटनांनी दिले आहे, असेही ते म्हणाले.
दिल्लीप्रमाणे उत्तर प्रदेशातही मोदी यांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नऊ सेलिब्रिटींच्या नावांची घोषणा केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह मनोज तिवारी, कैलास खेर, राजू श्रीवास्तव, सुरेश रैना आणि मोहम्मद कैफ आदींच्या नावांची घोषणा मोदी यांनी केली. त्याचप्रमाणे स्वामी रामभद्राचार्य, देविप्रसाद द्विवेदी आणि मनू शर्मा यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली.