देशात वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन सर्व रुग्णालयांत अपघातग्रस्तांना पहिल्या पन्नास तासांत उपचारांसाठी विनारोकड सुविधा देण्यात येईल आणि त्यासाठी रस्ते वाहतूक, सुरक्षा विधेयक संमत केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.
१५ मिनिटांच्या कार्यक्रमात त्यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी दलांचे कौतुक केले. शेतकरी व वैज्ञानिक करीत असलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले आहे. ईशान्येकडील राज्यांत असलेले प्रश्न समजून घेण्यासाठी तेथे एक पथक आठवडाभराच्या भेटीवर पाठवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात समाविष्ट करावयाच्या मुद्दय़ांवर त्यांनी सूचना मागवल्या आहेत. विविध सामाजिक प्रश्नांवर बोलताना त्यांनी संसदेतील गोंधळावर काही बोलण्याचे टाळले. रस्ते अपघातांबाबत त्यांनी सांगितले, की दिल्लीत एक स्कूटरस्वार अपघात होऊन रस्त्यावर रक्तस्राव होत असताना विव्हळत पडला होता; पण त्याला कुणी मदत केली नाही. अनेक लोकांनी आपल्याला रस्ता सुरक्षेवर बोलण्यास सुचवले. भारतात प्रत्येक मिनिटाला अपघात होत असतात आणि दर चार मिनिटाला एक मृत्यू होत असतो व त्यातील एकतृतीयांश हे १५ ते २५ वयोगटांतील असतात, हे लक्षात घेऊन सरकार नवे विधेयक आणणार आहे. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा धोरण व सुरक्षा कृती योजना जाहीर करणार आहे. रस्ते अपघातातील जखमींना ५० तास कुठलेही पैसे नसले तरी रुग्णालयांना उपचार करावे लागतील अशी तरतूद केली जाणार आहे. हा प्रकल्प पहिल्यांदा गुडगाव, जयपूर, वडोदरा, मुंबई, रांची आणि मौर्य राष्ट्रीय महार्गावर अमलात येईल. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेत सर्व खेडय़ांत २४ तास वीजपुरवठा केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. या योजनेचे उद्घाटन त्यांनी शनिवारी पाटणा येथे केले होते.
कारगिल युद्धात तीन महिने पाकिस्तानी सैन्याशी लढून विजय मिळवणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला व त्यागाला आपण सलाम करतो. आपला एकेक सैनिक १०० जणांना भारी पडला अशा शब्दांत त्यांनी जवानांच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, कारगिल युद्ध केवळ सीमेवर लढले गेले नाही तर त्यात प्रत्येक खेडे व शहर सहभागी होते. अनेक आयाबहिणींचे सुपुत्र आणि बंधूंनी युद्धात मर्दुमकी गाजवली. नुकत्याच विवाह झालेल्या मुलींनी युद्धभूमीवर लढणाऱ्या पतींच्या रूपाने हे युद्ध लढले.