X

पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा रद्द; उच्चस्तरीय बैठक घेणार!

करोना परिस्थितीसंदर्भातल्या उच्चस्तरीय बैठकीमुळे घेतला निर्णय

देशात करोनाचा कहर सुरुच आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्याचा आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द केला आहे. देशातल्या करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या उच्चस्तरीय बैठक आयोजित केली असल्याने हा दौरा रद्द केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. देशातल्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दिल्लीबरोबरच अन्य काही राज्यांनी ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचं सांगितलं आहे. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेशही दिले आहेत.

अनेक राज्यांना भासत असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेच्या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी ऑक्सिजनचं उत्पादन वाढवणं, त्याच्या वितरणाचा वेग वाढवणं आणि त्याचा पुरवठा निश्चित करण्यावर भर देण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं.

पश्चिम बंगालमध्ये पाच टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आहेत. आज निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. २६ एप्रिलला, सातव्या टप्प्यात ५ जिल्ह्यातल्या ३६ जागांसाठी मतदान होईल. तर आठव्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला होणार आहे.

23
READ IN APP
X