चीनमध्ये जी-२० परिषदेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
भ्रष्टाचार व आर्थिक गुन्हेगारांना मोकळे रान मिळू नये यासाठी प्रभावी आर्थिक व्यवस्थापनाची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० देशांच्या बैठकीत व्यक्त केले. सदस्य देशांनी काळय़ा पैशाचे व्यवहार होऊ नयेत, यासाठी बँकिंग क्षेत्रातील गुप्ततेचे जाळे कमी करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
भ्रष्टाचार, काळा पैसा, करचुकवेगिरी यांना आळा घालण्यासाठी आर्थिक प्रशासन प्रभावी व मध्यवर्ती भूमिकेत असले पाहिजे. आर्थिक गुन्हेगारांना मोकळे रान मिळता कामा नये व ज्यांनी काळा पैसा दडवला असेल अशांना बिनशर्त संबंधित देशांच्या हवाली केले पाहिजे. बँकिंग व्यवहारातील काही आंतरराष्ट्रीय र्निबध व गोपनीयता कमी केली तर भ्रष्टाचार दडवता येणार नाही. जागतिक अर्थव्यवस्था ही सर्वसमावेशक व शाश्वत वाढीसाठी अनुकूल असली पाहिजे. जागतिक आर्थिक सुरक्षा जाळे मजबूत केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, प्रादेशिक आर्थिक करार व द्विपक्षीय करार यांच्या माध्यमातून संवाद साधला पाहिजे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले, की आर्थिक स्थिरता निर्माण करणाऱ्या संस्थांनी त्यांच्या उद्दिष्टांपासून ढळता कामा नये. नाणेनिधी ही उसन्या साधनांवर अवलंबून असणारी संस्था नसावी, असे मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. २०१७ च्या वार्षिक बैठकीत नाणेनिधीच्या कोटा पद्धतीवर निर्णय घेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली. भारताला विकासासाठी ऊर्जेची गरज आहे त्यासाठी अणुऊर्जा, जीवाश्म इंधने व पुनर्नवीकरणीय ऊर्जा यांचे संमिश्र वापरले पाहिजे. जी २० देश जगातील ८५ टक्के उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करतात. अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन, अमेरिका, युरोपीय समुदाय हे जी २० गटाचे सदस्य आहेत.
मोदी-थेरेसा मे यांच्यात चर्चा
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांशी त्यांनी प्रथमच चर्चा केली. दोन्ही देशांतील संधींबाबत त्यांनी चर्चा केल्याचे समजते. पंतप्रधानपदी निवड झाल्याबाबत मे यांचे मोदी यांनी अभिनंदन केले. दोन्ही देशांत वाढत्या संधी असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 2:36 am