“काँग्रेसनं खोटं बोलून देशाला स्वप्न दाखवलं होतं. काँग्रेसचे नेते पहिले गरीबी हटवणार, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, वन रँक वन पेन्शन योजना सुरू करणार असं म्हणत होते. काँग्रेसनं अनेक गोष्टी सांगितल्या. पण एकही काम केलं नाही. आज काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की त्यांचे लोकसभा आणि राज्यसभेत मिळूनही शंभर खासदार नाहीत. काही राज्यांमध्ये तर त्यांना खातंही उघडता आलेलं नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काँग्रेस चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहेत आणि दुसऱ्यांच्या मदतीनं ते वाचण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील अररिया येथील फारबसगंजमध्ये एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

“काही लोकं केवळ गरीबांच्या नावाची माळ जपत बसतात आणि आपला महाल तयार करतात. काही लोकं केवळ आपल्यासाठीच काम करतात. या लोकांना तुमचं दु:ख समजत नाही. काही वर्षांपूर्वी कोसीवरील पूल तुटला होता. त्यानंतर तो पुन्हा बनू शकला नाही. परंतु आमच्या सरकारनं तो पूर्ण केला. यापूर्वी बिहारची ओळख वेगळ्या पद्धतीची होती. या ठिकाणी सत्तेत असलेल्या लोकांनी बिहारची परिस्थिती खराब केली होती,” असा आरोपही मोदींनी यावेळी केला.

आणखी वाचा- बिहारने जंगलराज आणि घराणेशाहीला नाकारलं : नरेंद्र मोदी

बिहारच्या विकासासाठी काम

“बिहारच्या जनतेला माहित आहे की कोण विकासासाठी काम करतंय. बिहारमध्ये परिवारवाद हरतोय आणि लोकशाही, विकासाचा विजय होत आहे. आज बिहारमध्ये अहंकार हरतोय आणि मेहनत जिंकतेय, बिहारमध्ये घोटाळ्याचा पराभव होत आणि लोकांचा हक्काचा विजय होत आहे, कायद्याचं राज्य आणणाऱ्यांचा विजय होत आहे. मी ते दिवस विसरू शकत नाही जेव्हा या ठिकाणी निवडणुकीची खेळखंडोबा झाला होता. त्यांच्यासाठी निवडणुकीचा अर्थ हिंसाचार, हत्या आणि बूथ कॅप्चरींग होतं. त्यावेळी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात होता आणि मतांची लूट केली जात होती,” असंही मोदी यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “लिहून घ्या… नितीश कुमार पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत”

महिलावर्गही सोबत

“बिहारमध्ये आज महिलावर्ग मोदींसोबत पुढे येण्यासाठी तयार आहे. जर बिहारमध्ये पूर्वीसारखी परिस्थिती असती तर गरीब आईचा मुलगा आज पंतप्रधान झाला नसता. गेल्या दशकात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारनं विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. येणारं दशक हे बिहारच्या नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यचं आहे. गेल्या दशकात घराघरात वीज पोहोचली आणि आता २४ तास ते देण्याचं दशक आलं आहे,” असंही त्यांनी स्पश्ट केलं. तसंच आता पाईप गॅसद्वारे जोडणी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बिहारमध्ये आता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता लोकांना विकासाचा लाभ मिळत आहे. सरकारकडून लोकांना सिलिंडर, शौचालय, आयुष्यमान भारतसारख्या योजनांद्वारे मदतीही केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जे लोकं समजात फुट पाडून सत्तेपर्यंत पोहोचू पाहत आहेत त्यांच्यापासू सावध राहण्याची आवश्यकता आहे. बिहारच्या लोकांना पक्क घर मिळत आहे. काही लोकांच्या घरांचं काम पूर्ण होऊन लवकरच ते त्यांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.