बेंगळुरूमध्ये सध्या अराजकता निर्माण झाली आहे. कर्नाटकातील सुमारे ७ लाख तर देशात तब्बल ४ कोटी घरं स्वातंत्र्यानंतर आजही अंधारात आहेत. केंद्राने दिलेल्या निधीचा राज्यात योग्य वापर होतो का? असा सवाल करत तुमचा उत्साह पाहून मला विश्वास आहे की, काँग्रेसची बाहेर पडण्याची ‘उलटी गिनती’ सुरू झाली आहे. काँग्रेस एक्जिट गेटजवळ आली आहे. कर्नाटकाला काँग्रेसची संस्कृती नकोय, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. बेंगरूळू येथे भाजपाच्या वतीने आयोजित परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.

यावर्षी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या सभेने भाजपाने प्रचारास अनौपचारिकपणे प्रारंभ केला. यावेळी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. ते म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात कर्नाटकसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. १७ हजार कोटींची गुंतवणूक, १६० किमी अंतराचे उपनगरीय रेल्वेची कामं बेंगळुरूत सुरू होणार आहेत. याचा शहरातील १५ लाख नागरिकांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार यावर्षी भारतमाला परियोजनेतंर्गत ९ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचेही ते म्हणाले.

अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे आणि महत्वाचे निर्णय घेतलेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळेल. शेतकऱ्याचे पुत्र असलेले येडियुरप्पा जर मुख्यमंत्री झाले तर शेतकऱ्यांसाठीच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जातील, असे सांगत त्यांनी येडियुरप्पाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.

आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या योजनांवरच मोदींचा भर होता. ते म्हणाले, खेडेगावांना जर सुविधा दिल्या तर शहरांमध्ये होणारे त्यांचे स्थलांतर थांबेल. त्यामुळे शहरांवर येणार ताणही कमी होईल. शेतकरी पिकवत असलेली फळं आणि भाजीपाला आमच्यासाठी ‘टॉप प्रायोरिटी’चे आहेत. टॉप (TOP) म्हणजे टोमॅटो, ओनियन (कांदा), पोटॅटो (बटाटा), अशी शब्दांची फोड त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही ‘ऑपरेशन ग्रीन’ सुरू केले आहे. ही योजना अमूल मॉडेलप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताची असेल, असे ते म्हणाले.

इथे कायद्यापेक्षा गुन्हेगारांचे राज्य दिसून येते, अशी टीका करत काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असल्याचे म्हटले. भारताने अंडर १९ विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्याचा उल्लेख करत या संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या प्रशिक्षण कौशल्याचे त्यांनी कौतुक केले.