काश्मीर खोऱ्यातील सध्याच्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारे वक्तव्य केले आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीमधून राज्याला कुणी बाहेर काढू शकत असेल तर ते फक्त पंतप्रधान मोदी आहेत. मोदींनी कोणताही निर्णय घेतला तरी त्याला संपूर्ण देशाचा पाठिंबा असेल, असे मुफ्ती यांनी म्हटले. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांचे हे विधान महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.  त्यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी गेल्यावर्षी नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे पाकिस्तानला दिलेल्या भेटीचेही कौतुक केले. दोन्ही देशांमध्ये तणाव असूनही मोदी यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याची हिंमत दाखवली. यावरून मोदींचे सामर्थ्य दिसून येते. यापूर्वीच्या पंतप्रधानांना पाकिस्तानमध्ये जायचे होते. मात्र, ते हिंमत करू शकले नाहीत. त्यामुळेच मोदींची लाहोर भेट ही त्यांच्या सामर्थ्याची कल्पना देणारी असल्याचे मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिकांमध्ये वारंवार संघर्ष होताना दिसत आहे. स्थानिकांकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. याशिवाय, याठिकाणच्या अनेक बँका लुटण्याचेही प्रसंग घडले आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी भारतीय लष्कराकडून गेल्या १५ वर्षातील सर्वात मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिकांमध्ये संघर्ष झाला होता. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर तीन जवान जखमी झाले होते.