’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा ’आयएनएस विक्रमादित्य देशाला अर्पण
भारताची सर्वात मोठी युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केली. संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात स्वयंपूर्णता आणली पाहिजे व आयातीवर अवलंबून राहणे कमी केले पाहिजे असे मोदी यांनी या वेळी सांगितले.
पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच दिल्लीबाहेर दौऱ्यावर आले होते. त्यांनी नौदल अधिकाऱ्यांना गोवा किनारपट्टीवर झालेल्या कार्यक्रमात सांगितले, की विक्रमादित्य युद्धनौका भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे हे ऐतिहासिक पाऊल आहे. आपल्या देशासाठी व नौदलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा हा दिवस आहे.
संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेवर भर देण्याची आवश्यकता प्रतिपादन करून त्यांनी सांगितले, की आपण प्रगत तंत्रज्ञानावर भर दिला पाहिजे, त्यामुळे देशाला फायदा होईल, संरक्षणसामग्री आयात करण्याची वेळ आपल्यावर यायला नको, उलट आपली संरक्षणसामग्री इतर देश घेतील अशी वेळ आली पाहिजे. देशासाठी बलिदान देणाऱ्यांसाठी युद्धस्मारक उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एक श्रेणी-एक निवृत्तिवेतन योजना आपले सरकार राबवेल, असेही ते म्हणाले.
आपल्या सरकारची जगात कुणाशीही बरोबरी करण्याची क्षमता आहे त्याचे कारण आपल्या सैनिकी सामर्थ्यांत आहे, असे सांगून ते म्हणाले, की नौदल एनसीसी यंत्रणा सुरू करण्यात यावी त्यामुळे नौदलाची शक्ती वाढण्यास मदत होईल.
‘सी किंग’ हेलिकॉप्टरमधून ते युद्धनौकेवर आले, तेव्हा त्यांना नौदलाने मानवंदना दिली व त्यांना युद्धनौकेची माहिती देण्यात आली. मिग २९ विमानातही ते बसले व युद्धनौकेचाही प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी ४४,५०० टन वजनाच्या विक्रमादित्य युद्धनौकेवर काही काळ व्यतीत केला. त्यांच्यासमवेत संरक्षण राज्यमंत्री राव इंदरजित सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल, संरक्षण सचिव आर.के.माथूर, नौदल प्रमुख रॉबिन धोवन हे होते.
विक्रमादित्य युद्धनौका भारताने रशियाकडून १५ हजार कोटी रुपयांना घेतली असून त्यावर मिग २९ के, सी हॅरीअर्स, पी ८ आय पाणबुडीविरोधी विमाने, टीयू १४२ एम व आयएल ३८ एसडी टेहळणी विमाने कामोव व सी किंग हेलिकॉप्टर्स आहेत. आयएनएस विराट व तलवार क्लास विनाशिकांची प्रात्यक्षिके त्यांनी पाहिली. या वेळी खूप पाऊस पडत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी हितगुज केले. विशेष म्हणजे २००४ मध्ये एनडीएच्या काळात ही युद्धनौका खरेदी करण्याचा करार झाला होता. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी ही युद्धनौका भारतीय नौदलात आली.

विक्रमादित्य युद्धनौका
* लांबी – २८४ मीटर
* रुंदी – ६० मीटर
* क्षेत्रफळ  तीन फुटबॉल मैदानांइतके
* मजले – २०
* डेक्स – २२
* मनुष्यवहन क्षमता – १६००
* सागरात सतत राहण्याची क्षमता – ४५ दिवस
* प्रकार- कीव क्लास विमानवाहू
* मूळ नाव- बाकू
* किंमत- १५,००० कोटी