प्रथितयश ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) आणि अध्यक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. फॉर्च्युन मासिकाने या भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला अमेरिकेतील महत्त्वाच्या कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मोदी यांनी सर्व सीईओंना सांगितले. ते म्हणाले, आम्ही विविध मंजुऱ्यांची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत केली आहे. त्याचबरोबर सरकारकडून वेगाने आणि पारदर्शकपणे निर्णय घेतले जातात. गेल्या वर्षभरात सरकारने कोणकोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले याचे सादरीकरणही या बैठकीवेळी मोदींनी केले. अनेक सीईओ या सादरीकरणाने प्रभावित झाले. सर्व सीईओंनी मोदींसोबत रात्रीचे भोजन घेतले.
या कार्यक्रमाला एकूण ४७ महत्त्वाच्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. त्यामध्ये पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी, डाऊ केमिकल्सचे अध्यक्ष अॅंड्र्यू लिव्हेरिस, लॉकहिड मार्टिनचे अध्यक्ष आणि सीईओ मार्लिन हेवसन, फोर्डचे अध्यक्ष मार्क फिल्ड इत्यादींचा समावेश होता.
मोदी सरकारचे कामकाज किती पारदर्शक आहे, याचा अनुभवच आज झालेल्या चर्चेतून आला, असा अनुभव काही सीईओंनी बैठकीनंतर व्यक्त केला. गेल्या वर्षभरात भारतात विविध क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे, अशी प्रतिक्रिया काही सीईओंनी व्यक्त केल्याचे भारताचे अमेरिकेतील राजदूत अरूण सिंग यांनी सांगितले.