पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका; भाजप अध्यक्षपदी जे. पी. नड्डा

निवडणुकीत जनतेने नाकारलेलेच आता जनतेत संभ्रम निर्माण करून अपप्रचार करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जगदप्रकाश नड्डा यांची निवड झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. नड्डा यांनी अमित शहा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली.

विरोधकांनी अपप्रचार केला तरी जनतेचा सरकारवर विश्वास आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी ताकदीनिशी प्रयत्न करूनही जनतेने भाजपला मोठय़ा मताधिक्याने सत्ता दिल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. पक्षाला या पुढेही आणखी मोठय़ा आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन जागृती करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. जनतेशी थेट संवाद हे पक्षाचे बलस्थान आहे. मोदींनी विरोधकांचा नामोल्लेख केला नसला तरी सध्या देशभर सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याचा संदर्भ पंतप्रधानांच्या वक्तव्याशी होता. जनतेचा भाजपला पाठिंबा असणे, हीच विरोधकांची अडचण आहे असा टोला पंतप्रधानांनी लगावला. भाजपची सत्ता दीर्घकाळ राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी टीकेमुळे विचलित होऊ नये असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

नड्डा यांच्या कार्यकाळात भाजप प्रगती करेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. नड्डा हे जुने सहकारी असून, स्कूटरवरून प्रवास करत पक्षकार्य केल्याची आठवण मोदींनी सांगितली. मावळते अध्यक्ष अमित शहा यांचे वर्णन पंतप्रधानांनी उत्तम कार्यकर्ता अशा शब्दांत केले.

सोमवारी  नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी व पक्षाचे ज्येष्ठ नेते राधामोहन सिंह यांनी भाजप मुख्यालयात नड्डा यांच्या निवडीची घोषणा केली. ही निवड तीन वर्षांसाठी आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपने कधीच विजय मिळवलेला नाही तेथे यश मिळवण्याचे उद्दिष्ट असल्याचे नड्डा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणात नड्डा यांनी स्पष्ट केले.  महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित असलेले ५९ वर्षीय नड्डा हे उत्तम संघटक मानले जातात. हिमाचल प्रदेश तसेच केंद्रातही मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.